अंबी : हॉटेलमध्ये पाण्याची बाटली आणण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या चारचाकी गाडीची काच फोडून अज्ञात चोरट्याने गाडीतील १ लाख ३० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना सोनारी येथील परंडा-अनाळा रस्त्यावर घडली. ही घटना १० जुलै रोजी मध्यरात्री घडली असून, याप्रकरणी अंबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शत्रुघ्न रामा गरड (वय ३४, रा. चिंचपूर खुर्द, ता. परंडा) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शत्रुघ्न गरड हे १० जुलै २०२५ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सोनारी येथील हॉटेल अविराज समोर आले होते. त्यांनी आपली चारचाकी गाडी हॉटेलसमोर उभी केली आणि पाण्याची बाटली आणण्यासाठी ते हॉटेलमध्ये गेले.
हीच संधी साधून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गाडीची काच फोडली, ज्यात त्यांचे १०,००० रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर चोरट्याने गाडीच्या पुढील बाजूच्या डिक्कीत ठेवलेली १ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.
गाडीजवळ परतल्यावर काच फुटलेली आणि रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात येताच शत्रुघ्न गरड यांनी ११ जुलै रोजी अंबी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) (चोरी) आणि ३२४(२) (नुकसान) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत असून, पुढील तपास सुरू आहे.






