धाराशिव: जिल्ह्यात चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोड्या, वाहनचोरी, आणि शेती साहित्याच्या चोरीच्या घटनांनी नागरिक भयभीत झाले आहेत. २५ ऑगस्ट रोजी एकाच दिवसात विविध ठिकाणी दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे १४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. यामध्ये कळंब तालुक्यातील सौर ऊर्जा प्रकल्पातील तब्बल १० लाखांच्या केबल चोरीच्या मोठ्या घटनेचाही समावेश आहे.
विविध पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपशील खालीलप्रमाणे:
कळंबमध्ये सर्वात मोठी चोरी, १० लाखांची केबल लंपास
कळंब तालुक्यातील मस्सा शिवारात असलेल्या प्रशाग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्लांटमधून चोरट्यांनी तब्बल १० लाख ५ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. वैष्णव श्रीधर मिसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २४ ते २५ ऑगस्ट दरम्यान चोरट्यांनी हॅवल्स कंपनीची कॉपर केबल आणि सोलर प्लेटला लावलेली कॉपर वायर चोरून नेली. या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
टेम्पोची ताडपत्री फाडून २.२७ लाखांचा माल चोरला
येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पारगाव टोलनाक्याजवळ उभ्या असलेल्या आयशर टेम्पोची ताडपत्री फाडून चोरट्यांनी २ लाख २७ हजार ६४ रुपये किमतीच्या मालावर डल्ला मारला. अरुणकुमार यादव (रा. दमन) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, टेम्पोतील विविध कार्टून बॉक्समधून एकूण ७३८ नग माल चोरीला गेला आहे.
घरफोड्या आणि रोख रक्कम चोरीच्या घटना
- तामलवाडी: देवकुराळी येथे दिलीप सराटे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी २० ग्रॅम सोन्याचे दागिने, मोबाईल आणि ४०,००० रुपयांची रोकड असा एकूण १ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला.
- ढोकी: रामवाडी येथे बाळासाहेब वाकुरे यांच्या घरात भिंतीवरून प्रवेश करून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि एका बोकडासह एकूण २३,७५० रुपयांचा माल चोरून नेला.
- उमरगा: मळगी येथील गोरोबा जाधव यांनी बँकेतून काढलेली ७०,००० रुपयांची रोकड असलेली पिशवी मोटरसायकलच्या हँडलला अडकवली होती. तुरोरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून अज्ञात व्यक्तीने ही पिशवी चोरून नेली.
वाहने आणि शेती साहित्यही लक्ष्य
- उमरगा: औराद पाटी येथून माधव गायकवाड यांची १५,००० रुपये किमतीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल (एमएच १४ डीए ११७३) चोरीला गेली.
- मुरुम: आष्टामोड येथील गणेश ऑटोमोबाईल्स समोरून शरणप्पा तेलीकुणे यांची १५,००० रुपये किमतीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल (एमएच २५ एक्स ७३४९) चोरण्यात आली.
- ढोकी: कसबे तडवळे येथील शेतकरी रामदास लांडगे यांच्या शेतातून सौर ऊर्जेवर चालणारी पाणबुडी मोटार आणि केबल असा एकूण २३,००० रुपयांचा ऐवज चोरीला गेला.
या सर्व घटनांप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र, एकाच दिवशी उघडकीस आलेल्या या घटनांमुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.