धाराशिव – शहरातील मिळकत क्र. ४१२७ वरील कै. के. टी. पाटील यांचा अनधिकृत पुतळा हटवण्याच्या प्रशासकीय निर्णयामुळे शहरात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर तक्रारदार बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून ६ ऑगस्ट रोजी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जमावबंदी आदेश लागू करण्याची मागणी केली होती. या पत्राची दखल घेत मंगळवारी शहराच्या विविध भागात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.
येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या पुतळ्याच्या निष्कासनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन, उपविभागीय दंडाधिकारी यांनी 6 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे 12:01 पासून ते रात्री 12:00 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
आदेशानुसार, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे श्रीपतराव भोसले हायस्कूल परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, बार्शी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, बार्शी नाका ते माणिक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत ते माणिक चौक, पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या न्यायाधीशांच्या निवासस्थानाचा परिसर आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर व मागील सर्व बाजूंचा परिसर या ठिकाणी उपोषण, आत्मदहन, धरणे, मोर्चा, रॅली, रस्ता रोको, ध्वनीक्षेपकांचा वापर किंवा इतर आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास मनाई करण्यात आली आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सुभेदार यांच्या पत्राची दखल
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने गुरुवर्य के. टी. पाटील यांच्या सन्मानार्थ हा पुतळा उभारला होता, परंतु आवश्यक परवानगी घेतली नव्हती. तक्रारीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने चौकशी करून पुतळा अनधिकृत असल्याचे निष्कर्ष काढले आणि तो हटवण्याचे आदेश दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार, ६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नगरपरिषदेकडून पुतळा हटवण्यात येणार आहे. या संवेदनशील कार्यवाहीसाठी नगरपरिषदेने विशेष तयारी केली असून, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना उपस्थित राहण्याची विनंती केली आहे. तसेच, पुरेसा पोलीस बंदोबस्तही तैनात केला जाणार आहे.
पुतळा हटवल्यास आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, शाळा-महाविद्यालयांतील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांकडून प्रशासनावर दबाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ६ ऑगस्ट रोजी भोसले हायस्कूल आणि भोसले उच्च माध्यमिक महाविद्यालयास सुट्टी जाहीर करून जिजाऊ चौक, आर्य समाज मंदिर, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, पुष्पक मंगल कार्यालय, पुजारी हॉटेल या परिसरात जमावबंदी आदेश लागू करावेत, अशी विनंती सुभेदार यांनी केली होती.