धाराशिव – धाराशिव जिल्ह्याच्या विकासाबाबतची उदासवाणी स्थिती आणि वाढती लोकनाराजी यावर लक्ष वेधत शिवसेना (ठाकरे गट) चे धाराशिव शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी एक तीव्र आणि उपरोधिक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. “धाराशिवचा विकास बघायचा असेल तर नेरुळला चला!” या शीर्षकासह त्यांनी पोस्ट केलेले व्यंगचित्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
या व्यंगचित्रात धाराशिवचे चित्रण मोडकळसलेल्या रस्त्यांपासून थेट नागरिकांच्या नाराज चेहऱ्यांपर्यंत करण्यात आले आहे, तर दुसरीकडे नेरुळमध्ये झगमगाट, उद्घाटन सोहळे आणि आधुनिक रस्त्यांचे दर्शन घडवले आहे.
सोमनाथ गुरव यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, जिल्हा नियोजन समितीच्या २६८ कोटींच्या निधीला स्थगिती कोणामुळे मिळाली, हे खुद्द पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीरपणे सांगितले आहे.
तसेच, शहरातील १४० कोटींच्या रस्त्यांची कामे १५ टक्के अधिक दराने द्यावीत, असा अट्टाहास नेमका कोण करत होता आणि त्या कामांना अडथळा आणणारे कोण आहेत, हे आता संपूर्ण जनतेला माहीत झाले आहे.
गुरव यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना, विकास कामांच्या आड येणाऱ्या प्रवृत्तींना उघडपणे जाब विचारला आहे.
सध्या हे व्यंगचित्र आणि त्यावरचा मजकूर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून, नागरिकांचाही या मुद्द्यांना जोरदार पाठिंबा मिळतो आहे.