धाराशिव : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 सुरू आहे. आज धाराशिवच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत (DIET) या प्रशिक्षणाचा चौथा टप्पा सुरु आहे. पहिल्याच दिवशी प्रशिक्षणाची वेळ साडेचार तास असतानाही ते दीड तास उशिरा सुरू होऊन अर्धा तास आधी संपले! याशिवाय, ब्रेक झाल्यावर तब्बल 80% शिक्षक गायब झाले, असे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
शिक्षकांसाठी प्रशिक्षण की दिखावा?
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP 2020) प्रभावीपणे लागू करण्यासाठी शिक्षक प्रशिक्षण अनिवार्य आहे. पण जेव्हा प्रशिक्षण स्वतःच एवढ्या हलगर्जीपणाने घेतले जाते, तेव्हा त्याचा उद्देशच फोल ठरतो.
- प्रशिक्षणाची वेळ साडेचार तास, पण सुरूवात दीड तास उशिरा!
- ब्रेकनंतर 80% शिक्षकांनी सरळ पोबारा!
- अर्धा तास आधीच प्रशिक्षणाचा शेवट!
या प्रकारामुळे शिक्षण खात्याच्या कार्यक्षमतेवर आणि शिक्षक प्रशिक्षणाच्या उद्दिष्टांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तक्रारींवर कारवाई शून्य; प्राचार्याविरुद्ध आंदोलन सुरूच
धाराशिव DIET कॉलेजचे हेच प्राचार्य दयानंद जटनुरे, ज्यांच्यावर ₹4,10,134 निधी अपहार केल्याचा ठपका आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते भास्कर वारे यांनी त्यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी मंत्रालयासमोर प्राणांतिक उपोषण सुरू केले आहे. शिक्षण खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे प्रशिक्षण आणि भ्रष्टाचार दोन्ही बिनधास्त सुरू असल्याचे हे उदाहरण आहे.
शासन कारवाई करणार की भ्रष्टाचाराला अभय देणार?
शिक्षण क्षेत्राचा पाया मजबूत करण्याऐवजी सरकारी यंत्रणा आणि प्रशिक्षण व्यवस्थापनाच्या अपयशामुळे संपूर्ण प्रक्रिया अयशस्वी होत आहे. आता शासन यावर गांभीर्याने दखल घेईल का? हा मोठा प्रश्न आहे!