धाराशिव – गेल्या अनेक वर्षांपासून वादात असलेल्या आणि आर्थिक परिस्थिती अत्यंत डबघाईला गेलेल्या धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. बँकेची मुदत संपण्यापूर्वीच हे संचालक मंडळ बरखास्त करण्याची शिफारस करण्यात आली असून, आता बँकेवर प्रशासक नेमण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यांचे बंधू बापूराव पाटील हे सध्या बँकेचे अध्यक्ष आहेत.
२० वर्षांपासून बँक संकटात, ३०० कोटींच्या ठेवी अडकल्या
जिल्हा बँक गेल्या २० वर्षांपासून मोठ्या आर्थिक संकटात आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या ३०० कोटींपेक्षा अधिक ठेवी बँकेत अडकलेल्या आहेत. बँकेकडून या ठेवी परत देण्यासाठी आतापर्यंत कोणतीही ठोस हालचाल करण्यात आलेली नाही, ज्यामुळे सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाले आहेत.
बँकेच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी आणि परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक सनियंत्रण समितीही नेमण्यात आली होती. मात्र, वर्ष उलटले तरी बँकेच्या परिस्थितीत काहीही सुधारणा झाली नाही. अखेर, मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा करून संचालक मंडळ बरखास्तीचा निर्णय घेण्यात आला. यावेळी बँकेला ७४ कोटी रुपये देण्याचा निर्णयही घेण्यात आल्याची माहिती आहे.
राजकीय खेळीची चर्चा; बसवराज पाटलांची आशा फोल
दोन वर्षांपूर्वी झालेल्या बँकेच्या निवडणुकीत आमदार राणा जगजितसिंह यांच्या पॅनलचा पराभव झाला होता. त्यावेळी बसवराज पाटील, राहुल मोटे आणि खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने विजय मिळवला होता.
माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. सत्तेचा फायदा होऊन बँकेला अडचणीतून वर काढता येईल आणि आपले बंधू बापूराव पाटील यांचे अध्यक्षपदही टिकून राहील, अशी त्यांना आशा होती. मात्र, संचालक मंडळ बरखास्त झाल्याने त्यांची ही आशा फोल ठरली आहे. सध्या बसवराज पाटील यांच्यावर लातूरच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. या सर्व घडामोडीमागे आमदार राणा पाटील यांनी राजकीय खेळी केल्याची चर्चाही जिल्ह्यात सुरू आहे.






