धाराशिव: जिल्ह्यात गुन्हेगारांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, गुरुवारी एकाच दिवशी विविध पोलीस ठाण्यांमध्ये दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि चोऱ्यांचे तब्बल सात गुन्हे दाखल झाले आहेत. उमरगा तालुक्यात रस्त्यावर जॅक लावून गाडी थांबवून पिस्तूलचा धाक दाखवत दरोडा टाकण्यात आला, तर तुळजापुरात देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाचे दीड लाखांचे सोन्याचे लॉकेट गर्दीचा फायदा घेऊन चोरण्यात आले. या घटनांमुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पिस्तूलचा धाक दाखवून ८० हजारांचा ऐवज लुटला
सर्वात गंभीर घटना उमरगा तालुक्यातील येणेगुर शिवारात घडली. सोलापूर येथील डॉ. अब्दुल गफुर जुनैदी (वय ६७) हे आपल्या कुटुंबासह गुरुवारी मध्यरात्री इर्टिगा कारमधून प्रवास करत होते. तुगावपासून एक किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या वळणावर अज्ञात दरोडेखोरांनी रस्त्यावर लोखंडी जॅक ठेवला होता. जॅकवर गाडी आदळल्याने डॉ. जुनैदी आणि त्यांचे नातेवाईक गाडीतून खाली उतरले. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या सहा ते सात दरोडेखोरांनी त्यांना काठी आणि पिस्तूलचा धाक दाखवला. दरोडेखोरांनी डॉ. जुनैदी यांचे जावई आणि भाची यांच्याकडील २३ हजार रुपयांची रोकड आणि १० ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून घेत पोबारा केला. याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुळजाभवानीच्या दारातच भाविकाला लुटले
लातूर येथील धनंजय बाळासाहेब हिप्परकर (वय ४९) हे २१ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आले होते. मंदिराच्या मुख्य द्वाराजवळ असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोराने त्यांच्या गळ्यातील ५० ग्रॅम वजनाचे, सुमारे १ लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे लॉकेट चोरून नेले. त्यांनी गुरुवारी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच
- तामलवाडी: माळुंब्रा (ता. तुळजापूर) येथील अमर नवनाथ वडणे यांचा ५ लाख ४० हजार रुपये किमतीचा कुबोटा कंपनीचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली घरासमोरून चोरीला गेली.
- धाराशिव: शिंगोली ते उपळा पाटी दरम्यान सुरू असलेल्या नवीन रेल्वेच्या कामाच्या ठिकाणाहून अज्ञात चोराने अल्टरनेटर, डीजी बॅटरी, केबल वायर आणि स्टील असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
- कळंब: तालुक्यातील माळकरंजा येथील श्रीराम उत्तम लोमटे यांच्या शेतातून उद्धव लोमटे, भागवत लोमटे आणि उषा लोमटे यांनी अतिक्रमण करून ५२ हजार रुपये किमतीचे २२ कट्टे सोयाबीन चोरून नेल्याची तक्रार शिराढोण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
- भूम: येथील आठवडी बाजारात खरेदीसाठी गेलेले शिवशंकर पांडुरंग पौळ यांच्या पॅन्टच्या खिशातून अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेत १५ हजार रुपयांची रोकड लंपास केली.
- कळंब: तालुक्यातील आंदोरा येथील मातंग नगरमधून १२,१०० रुपये किमतीचे सिमेंटचे पाईप अज्ञात चोराने चोरून नेले.
एकाच दिवशी जिल्ह्यात दरोडा आणि चोऱ्यांच्या एवढ्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.







