धाराशिव – . जिल्हा शासकीय रुग्णालयाचे वादग्रस्त आणि भ्रष्ट जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांची मुरुडला बदली होऊन तीन महिने झाले तरी हे पद अद्याप रिक्त आहे. प्रभारी अधिकाऱ्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयाचा कारभार रामभरोसे सुरु आहे.
प्रतिनियुक्तीचे कोणतेही अधिकार नसताना, अधिकाराचा गैरवापर करून , जिल्हा शल्य जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी ८ ते १० वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्ती दिली होती. एका प्रतिनियुक्तीचा दर ४० ते ५० हजार होता. त्याची बातमी धाराशिव लाइव्हने दिल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांना चांगलेच धारेवर धरून कानउघडणी केली, तसेच आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ अर्चना भोसले यांना फोन करून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. अखेर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांची मुरुड ( जि. लातूर ) येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकाय अधीक्षक म्हणून उचलबांगडी करण्यात आली आहे.
डॉ. गलांडे यांची उचलबांगडी होऊन आजमितीस तीन महिने झाले तरी हे पद रिक्तच आहे. डॉ. गलांडे यांची बदली झाल्यानंतर तात्पुरता स्वरूपात अतिरिक्त पदभार डॉ. इस्माईल मुल्ला यांच्याकडे देण्यात आला होता. पण मुल्ला यांना हे पद झेपवाट नसल्याने आजाराचे कारण देऊन ते २८ नोव्हेंबरपासून रजेवर गेले आहेत. त्यानंतर आता तात्पुरता स्वरूपात अतिरिक्त पदभार कळंब उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ धर्माधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहे.
धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास दोन वर्षाच्या भाडेतत्वावर देण्यात आले आहे. जिल्हा रुग्णलयाचे प्रमुख हे जिल्हा शल्य चिकित्सक तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रमुख अधिष्ठता आहेत. ऐकमेकांच्या अधिकारावरून जिल्हा शासकीय रुग्णालयात साधी पित्ताची गोळी आणि ors मिळणे देखील दुरापस्त झाले आहे.