धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. डॉक्टर नसल्याने ११ वर्षांच्या निष्पाप पौर्णिमाचा मृत्यू झाला, आणि प्रशासन मात्र नेहमीप्रमाणे “चौकशी”च्या गोंधळात प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे. आज एक गरीब कुटुंब आपल्या लेकराला गमावून आक्रोश करत आहे, उद्या कोण?
सरकारी रुग्णालय की ‘बळी देणारे’ केंद्र?
या रुग्णालयात रुग्णांपेक्षा शिकाऊ डॉक्टर आणि नर्स जास्त असावेत, असे वाटते. रात्री डॉक्टर नसल्याने नर्स आणि शिकाऊ डॉक्टरांनी मिळून एका ११ वर्षांच्या मुलीवर २० मिनिटांत ४ इंजेक्शन ठोकली. डॉक्टर नव्हते, हे माहीत असूनही तिच्या जिवाशी खेळ केला गेला. शेवटी काय? त्या निष्पाप पोरीचा मृत्यू.
ही काही पहिली घटना नाही. काही दिवसांपूर्वीच एका पोलिसाचा मृत्यू इथे झाला. त्याची चौकशी कुठे पोहोचली? काहीच नाही. त्या घटनेची शाई वाळते न वाळते, तोच पुन्हा एका निष्पाप जीवाचा बळी गेला. म्हणजे हे ठरलेलेच आहे का? सरकारी रुग्णालयात गेले, की बाहेर येण्यासाठी मृतदेहाच्या बाहेर रांगा लागतात!
“डॉक्टर पहाटे ५ वाजता आले, तोपर्यंत माझी मुलगी गेली होती!”
या मुलीची आई रडून रडून सांगतेय – “माझ्या पोरीची तडफड पाहवत नव्हती. पण डॉक्टर येत नव्हते. डॉक्टर पहाटे ५ वाजता आले. तोपर्यंत माझी पोरी गेली होती.”
हा काय प्रकार आहे? एका सरकारी रुग्णालयात रुग्ण असताना डॉक्टर गैरहजर? मग हे सरकारी रुग्णालय आहे की ‘रिकामा’ आरोग्य केंद्र? लोकांनी कर भरायचा, आणि डॉक्टरांनी खासगी दवाखान्यांत पैसे छापायचे?
कोऱ्या कागदावर सही घेतली – धक्कादायक प्रकार!
मुलीचा मृत्यू झाल्यावर तिच्या आईकडून कोऱ्या कागदावर सही घेतली गेली. हा प्रकार म्हणजे लपवाछपवी नाही का? आधी सही घेतली आणि नंतर कागदात काय लिहिले, हे कोण सांगणार? यावर कारवाई होणार का? की पुन्हा नेहमीप्रमाणे “तपास सुरू आहे”च्या नावाखाली फाईल बंद होणार?
अधिष्ठातांचे आश्वासन म्हणजे मखलाशी?
या घटनेनंतर महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चव्हाण यांनी नेहमीची गुळमुळीत प्रतिक्रिया दिली – “चौकशी समिती स्थापन केली आहे, २४ तासांत अहवाल येईल, दोषींवर कारवाई होईल.”
अहो, जनतेला हे तोंडपाठ झालंय! एकही डॉक्टर निलंबित होत नाही, कोणावरही ठोस कारवाई होत नाही. २४ तासांत अहवाल द्यायचा आणि मग तो कुठे गायब होतो, हे कधीच कळत नाही. या मृत्यूसाठी जबाबदार डॉक्टर कोण? त्या महिला कर्मचाऱ्याने कोऱ्या कागदावर सही का घेतली? नर्स, शिकाऊ डॉक्टर आणि वरिष्ठ डॉक्टरांवर काय कारवाई झाली? हा अहवाल कोणाला दिसतोय?
आमचा सवाल : सरकारी डॉक्टर फक्त पगार घेण्यासाठीच आहेत का?
आज धाराशिव जिल्हा रुग्णालयात मृत्यूचं तांडव सुरू आहे. सरकारी डॉक्टरांना जबाबदारीची जाणीव आहे की नाही?
- सरकारी रुग्णालयात डॉक्टर नसतील, तर गरिबांनी जायचं कुठे?
- कोऱ्या कागदावर सही घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार की नाही?
- “चौकशी”च्या नावाखाली प्रकरण दडपण्याचा खेळ किती दिवस चालणार?
सरकारला आणि आरोग्य यंत्रणेला अल्टीमेटम!
आता पुरे झालं! ही केवळ चौकशी समिती बसवायची वेळ नाही, तर दोषींवर थेट निलंबनाची, कठोर कारवाईची वेळ आहे. जर सरकारला जनतेच्या जीवाची किंमत नसेल, तर लोकांनीच आवाज उठवावा लागेल. धाराशिव जिल्हा रुग्णालयाला “मृत्यूचा कारखाना” होऊ द्यायचं नाही!