धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयात पुन्हा एकदा हलगर्जीपणाचा प्रकार समोर आला आहे. डॉक्टरांच्या अनुपस्थितीत नर्स आणि शिकाऊ डॉक्टरांनी २० मिनिटांत ४ इंजेक्शन दिल्यानंतर ११ वर्षीय पौर्णिमा गायकवाड हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या बेजबाबदार व्यवस्थेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
रात्री १२ च्या सुमारास मृत्यू, पण डॉक्टर पहाटे ५ वाजता पोहोचले!
बार्शी तालुक्यातील मळेगाव येथील आणि कामानिमित्त धाराशिव शहरात वास्तव्यास असलेल्या पौर्णिमा गायकवाड हिला पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने मंगळवारी रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्या रात्री कोणीही डॉक्टर उपस्थित नव्हते. नर्स आणि शिकाऊ डॉक्टरांनी मिळून केवळ २० मिनिटांत ४ इंजेक्शन देऊन उपचार सुरू केले. मात्र, तरीही तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही.
रात्री ११.३० वाजताच्या सुमारास पौर्णिमाला अधिक त्रास होऊ लागला, पण डॉक्टर येण्याचे नाव घेत नव्हते. अखेर रात्री १२ वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, डॉक्टर पहाटे ५ वाजता रुग्णालयात आले!
मृत्यूनंतर कोऱ्या कागदावर सही – नातेवाईकांचा गंभीर आरोप!
पौर्णिमाच्या मृत्यूनंतर रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनी तिच्या आईकडून कोऱ्या कागदावर जबरदस्तीने सही घेतली, असा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. मृत्यूनंतर दोष झाकण्यासाठी हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
“माझ्या पोरीची तडफड पाहवत नव्हती” – आई साधना गायकवाड यांचा आक्रोश
पौर्णिमाची आई साधना गायकवाड यांनी भावनावेगळ्या शब्दांत आपली व्यथा मांडली. त्या म्हणाल्या,
“माझ्या पोरीला खूप त्रास होत होता, पण रात्री कोणीही डॉक्टर आला नाही. पहाटे ५ वाजता डॉक्टर आले, पण तोपर्यंत माझी मुलगी गेली होती. तिच्या मृत्यूनंतर मला कोऱ्या कागदावर सही करायला लावली. गरीब लोक चांगल्या उपचारासाठी इथे येतात, पण डॉक्टरच अशी वागणूक देतात. दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे!”
पंधरवड्यातील दुसरी घटना – याआधीही एका पोलिसाचा मृत्यू
केवळ काही दिवसांपूर्वीच राघुचीवाडी येथील एका पोलिसाचा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला होता. त्या घटनेची शाई वाळते न वाळते, तोच पुन्हा ११ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
चौकशी समिती स्थापन – २४ तासांत अहवालाचा आदेश
या धक्कादायक घटनेची दखल घेत अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चव्हाण यांनी चौकशी समिती स्थापन केली असून, २४ तासांत अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी आश्वासन दिले की, “या घटनेची सखोल चौकशी केली जाईल. दोषींवर कारवाई करण्यात येईल. मी नुकताच पदभार स्वीकारला असून, लवकरच चित्र बदलेल, याची खात्री देतो.”
रुग्णालय प्रशासन जबाबदार? दोषींवर कारवाई होणार का?
धाराशिव जिल्हा रुग्णालयात सतत होणाऱ्या मृत्यूंमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसणे, उपचारादरम्यान निष्काळजीपणा होणे आणि मृत्यूनंतर जबरदस्तीने सही घेतली जाणे – या घटनांमुळे प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पुढे आणखी किती निष्पाप जीव गमवावे लागणार? दोषींवर कारवाई होणार की पुन्हा चौकशीच्या नावाखाली प्रकरण दडपले जाणार?