धाराशिव जिल्हा रुग्णालयात शल्य चिकित्सक पदावरून सुरू असलेली ‘सेवा’ सध्या चर्चेचा विषय बनली आहे. गेल्या वर्षभरापासून जिल्हा शल्य चिकित्सकाचे पद रिक्त होते. परंतु त्या रिक्त पदाला सजवून ठेवण्याचा मान मिळवला तो डॉ. राजाभाऊ गलांडे यांचा. गलांडे साहेबांनी आपल्या प्रतिनियुक्तीचे महत्त्व सांगत, लाखो रुपयांची लाच घेतली आणि लगेचच त्यांना मुरुडला उचलबांगडी करण्यात आली. जिल्हावासीयांना वाटलं, चला, आता काहीतरी सुधारणा होईल, पण खरं तर तो फक्त ‘पहिला भाग’ होता!
गलांडे साहेब गेले, तर साहेबांचे पराक्रम पुन्हा चालू ठेवायला प्रभारी म्हणून आले डॉ. मुल्ला. गलांडे यांनी घेतलेला ‘लाच पराक्रम’ साधा वाटावा, असं दाखवत, मुल्ला साहेबांनी सुद्धा काही कमी कामगिरी केली नाही. त्यांनी खरंच माणसांना ‘वैद्यकीय कला’ शिकवली. काही दिवसांपूर्वी त्यांनी गुपचूप रुग्णालयातल्या औषधांच्या खोके, लोखंडी पलंग, आणि विविध मशिनरी ‘गुपचूप’ आपल्या जातभाईच्या हाती विकून टाकली.
आता या विक्रीत काही औपचारिकता नाही, जाहिरात नाही, ना कुठे टेंडर. म्हणजे, ‘धाराशिव जिल्हा रुग्णालयाचा भंगार विक्री महोत्सव’ हे गोपनीय ठेवलं गेलं. भंगार विक्रीमधून मोठा रकमेचा ओघ त्यांच्या खिशात गेला. सरकारी तिजोरीत जरी एक रुपयाही पडला नसला तरी, डॉ. मुल्ला आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांच्या खिशात मात्र या पैशांचा रंगतदार ओघ सुरू झाला. धाराशिवमधील नागरिकांना या नवीन धंद्याची खबर लागली आणि साहजिकच खळबळ उडाली.
आता या सगळ्या खेळी-मेळीच्या ‘कथा’चा पुढचा अध्याय म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ. धनंजय चाकूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. धाराशिवमधील जनता चाकूरकर साहेबांना नव्या आशांनी पाहत आहे. मात्र एक प्रश्न मात्र त्यांच्या मनात कायम आहे: “चाकूरकर साहेबांनी काही नवा पराक्रम घडवावा का हा मागील दोन साहेबांचे पराक्रम थांबवून सरकारी तिजोरी भरावी?”
धाराशिव रुग्णालयातले हे ‘डॉक्टरांचे कारनामे’ जिल्हावासीयांना नव्या चर्चेला तोंड फोडत आहेत. सरकारी अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी म्हटलं की, “डॉक्टरांचे पराक्रम तपासून पाहूच.” पण इतक्या वेळा हे ऐकलेलं ऐकून जनता मात्र वैतागली आहे. रुग्णालयात गेलेले प्रत्येक नवे साहेब काहीतरी नवीनच करून दाखवतात, असं एकंदरीत या ठिकाणी समजतंय. त्यामुळे चाकूरकर साहेबांचा कार्यकाळ नेमका काय ठरेल, हे पाहणं धाराशिव जिल्हावासीयांसाठी एक नवीन मनोरंजन ठरलं आहे.
धाराशिवमध्ये आता चर्चा सुरू झाली आहे की, पुढच्या वेळी जिल्हा शल्य चिकित्सकपदाचा राजीनामा देताना ‘भंगार विक्रीतल्या सर्वाधिक उत्पन्न’ श्रेणीतील ‘धाराशिव वैद्यकीय पुरस्कार’ देखील दिला जावा. एक वाक्य मात्र धाराशिवच्या रुग्णालयाच्या फलकावर झळकू लागलं आहे: “रुग्णालयाच्या मालमत्तेचा व्यावसायिक वापर करू नका – तो तर आमच्या डॉक्टरांचं एक विशेष क्षेत्र आहे!”