धाराशिव – महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ विस्तारात धाराशिव जिल्ह्याला यंदा भोपळा मिळाला असून, जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांना मंत्रिपद मिळाले नाही. परंड्याचे आमदार आणि शिवसेनेचे तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे, तर तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनाही संधी नाकारण्यात आली आहे.
सावंत यांना डच्चू का?
अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर तानाजी सावंत यांना शिवसेनेतून मंत्रीपद मिळाले होते. त्यांच्याकडे आरोग्य खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, त्यांच्या कार्यकाळात गैरव्यवहाराचे आरोप झाले, त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे.
राणा जगजितसिंह यांना पुन्हा निराशा
तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना मंत्रिपद मिळण्याची जोरदार शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु या विस्तारात त्यांचीही वर्णी लागली नाही, त्यामुळे त्यांना पुन्हा निराशा पदरी पडली आहे.
जिल्ह्याला पालकमंत्री परजिल्ह्यातून
धाराशिव जिल्ह्यातील चार पैकी दोन आमदार महायुतीचे असतानाही, जिल्ह्याला यंदा मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळालेले नाही. त्यामुळे धाराशिवच्या पालकमंत्रिपदी आता परजिल्ह्यातील मंत्री नियुक्त होण्याची शक्यता आहे.
या निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. तानाजी सावंत यांना मंत्रीमंडळातून वगळणे आणि राणा जगजितसिंह यांना संधी न देणे यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे.
मंत्रिपद मिळाल्याने तानाजी सावंत नाराज, नागपूर सोडून रवाना
माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत मंत्रीपद न मिळाल्याने नाराज झाले असून, त्यांनी बॅग पॅक करून नागपूरवरून रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ते हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे.
गेल्या मंत्रीमंडळात तानाजी सावंत यांच्याकडे आरोग्य विभागाचा कार्यभार होता. मात्र, त्यांच्या कार्यकाळात काही आरोप आणि वाद निर्माण झाल्याने यावेळी मंत्रीमंडळ विस्तारात त्यांना संधी नाकारण्यात आली आहे. या निर्णयामुळे सावंत नाराज असल्याचे बोलले जात आहे.
सावंत यांच्यावरील आरोप आणि त्यानंतर मंत्रीपदासाठी त्यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यांचा हा पाऊल उचलण्याचा निर्णय आगामी राजकीय घडामोडींवर काय परिणाम करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.