धाराशिव : धनगर जमातीला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी त्वरित प्रमाणपत्र मिळावे , या मागणीसाठी धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोर शाम तेरकर, कमलाकर दाणे, समाधान पडुळकर आणि राजू मैंदाड हे मागील तीन दिवसापासून उपोषणास बसले आहेत. . या उपोषणाला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.
धनगर समाज अनेक वर्षांपासून एसटी प्रमाणपत्रासाठी लढा देत आहे. आषाढी एकादशीच्या पावन दिवशी उपोषणस्थळी विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत पूजा करून सुवासिनी महिलांनी आरती केली आणि राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकार यांना सद्बुद्धी देण्यासाठी विठ्ठलाला विनंती केली. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
सकल मराठा समाज तुळजापूर यांनी धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीला पाठिंबा दर्शवला आहे. तुळजापूर मधील कार्यकर्त्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन धनगर समाजाची मागणी अत्यंत योग्य असल्याचे म्हटले आणि त्यांना एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊन त्वरित प्रमाणपत्र देण्याची मागणी केली.
सकल मराठा समाज येडशीनेही एसटी आरक्षण अंमलबजावणीला बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे. येडशी मधील मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने उपोषणकर्त्यांना भेट देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आणि धनगर समाजाचा प्रश्न अतिशय जिव्हाळ्याचा असल्याचे म्हटले. येडशी मधील मराठा समाज धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीला पूर्ण पाठिंबा देतो, असे पत्र देण्यात आले.
मनोज जरांगे पाटील यांनी धाराशिव येथील उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपला या आरक्षणाच्या अंमलबजावणीस पाठिंबा असल्याचे सांगितले . . तिसऱ्या दिवसापर्यंत जवळजवळ दोन हजार लोकांनी उपस्थित राहून पाठिंबा दिलेला आहे.