धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघाची अवस्था सध्या बेवारशी झाली आहे. मराठी पत्रकार परिषदेला प्रशासक लागून इतकी वर्षे झाली की, आता हा संघ अक्षरशः अनाथ झाला आहे. पूर्वी पत्रकारांसाठी अभिमानाची गोष्ट असलेल्या या संघाचे दोन कारभारी इतके मनमानी झाले की, कंटाळून अनेक पत्रकार बाहेर पडले. त्यांनी नवीन संघ काढला, पण ‘मराठी’ शब्द गळून पडला आणि नोंदणी सोडली, तर संपत्ती हाती लागली नाही.
मात्र, जुन्या पत्रकार संघाच्या हाती भक्कम मालमत्ता होती – पत्रकार भवन! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ १९९० मध्ये भारत गजेंद्रगडकर अध्यक्ष असताना उभारलेले हे भवन एकेकाळी पत्रकारांचे गड होते. पण आता तिथे कारभाराची स्थिती अशी झाली आहे की, जणू मोबाईल टॉवरवर कावळे बसावेत तसे काही लोक तिथे तळ ठोकून बसले आहेत. अनधिकृत कारभार इतका वाढला की, पत्रकार भवनाचे पीआर कार्ड रद्द झाले आणि मालकी कुठल्या माने काकांकडे गेली. पण ‘राजे’ ताबा सोडायला तयार नाहीत!
याच संघाने १९९६ मध्ये सांजा रोडवर अर्धा एकर जागा घेतली होती. योजना मोठी होती—भव्य पत्रकार भवन उभारण्याची! पण काही हुशार मंडळींनी आकाशवाणी जवळ सरकारची फसवणूक करत ६ गुंठे जागा काढली आणि लगेच तक्रारी झाल्या. सरकारलाही कळले की, ‘पत्रकार’ नावाखाली लुडबूड सुरू आहे, आणि त्या जागेचा पुन्हा सरकारी ताबा घेतला गेला.
सांजा रोडवरील अर्धा एकर जागा विकायचा कटही शिजला होता, पण ज्येष्ठ पत्रकार सुनील ढेपे यांनी दोन लबाड लांडग्यांना पायात पकडले आणि जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी तात्काळ स्टे ठोकला. आता ही जागाही ‘वर्ग दोन’ झाली आहे, म्हणजे विक्री शक्य नाही.
आता आम्ही म्हणजेच पत्रकारांचे बादशाह म्हणणारे रंगा आणि बिल्ला धास्तावले आहेत. ना जागा विकता येत आहे, ना पत्रकार भवनाचा ताबा बळकावता येत आहे. राजा, आता कोणता डाव टाकणार?