धाराशिव: जिल्ह्यात मालमत्ता विषयक गुन्ह्यांचे प्रमाण वाढताना दिसत असून, विविध पोलीस ठाण्यांत चोरीच्या घटनांची नोंद झाली आहे. यामध्ये शेळ्या, सोन्याची चैन आणि मोटरसायकल चोरीला गेल्याच्या घटनांचा समावेश आहे. या सर्व घटनांतील आरोपी अद्याप अज्ञात असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
शेतातून शेळ्या-बोकड लंपास
ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येवती येथे शेत गट क्रमांक ३१ मधील पत्र्याच्या शेडमध्ये बांधून ठेवलेले दोन बोकड आणि दोन शेळ्या, एकूण ४५,००० रुपये किमतीची जनावरे अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना १९ मे २०२५ रोजी सायंकाळी ७.३० ते रात्री ८.३० च्या दरम्यान घडली. याप्रकरणी संभाजी शाहू खांडेकर (वय ४६ वर्षे, रा. येवती) यांनी २३ मे २०२५ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
एस.टी. बसमधून सोन्याची चैन गायब
दुसऱ्या घटनेत, कळंब-पुणे एस.टी. बसने प्रवास करत असताना येरमाळा येथे भाग्यश्री मच्छिंद्र तोरगले (वय २३ वर्षे, रा. ईटकुर, ता. कळंब) यांच्या पर्समधून २० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, अंदाजे किंमत १,२७,५७० रुपये, अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. ही घटना २२ मे २०२५ रोजी सकाळी १० ते ११ च्या दरम्यान घडली. भाग्यश्री तोरगले यांनी २३ मे २०२५ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून येरमाळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बसस्थानकावरून मोटरसायकल चोरीला
तिसऱ्या घटनेत, धाराशिव शहरातील बसस्थानकावरून होंडा शाईन कंपनीची मोटरसायकल (क्र. एमएच २५ ए.आर. २९४२), अंदाजे किंमत २५,००० रुपये, अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. ही चोरी १६ मे २०२५ रोजी सकाळी ८.३० ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान झाली. याबाबत अभिमन्यू भगवान माळी (वय ५३ वर्षे, रा. कोर्ट कॉलनी, सांजा रोड, धाराशिव) यांनी २३ मे २०२५ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांकडून अधिक तपास सुरू असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे.