धाराशिव : जिल्ह्यातील कळंब, तुळजापूर आणि मुरुम पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरीच्या तीन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये घरातील चांदीचे दागिने व रोख रक्कम, दुचाकी तसेच सोलार प्लेट आणि केबल असा एकूण सुमारे 99 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कळंबमध्ये घराचे कुलूप तोडून 29 हजारांचा ऐवज चोरीला
कळंब शहरातील द्वारकानगरी येथील हनुमंत दगडू थोरात (वय 60) यांच्या घराचे कडी-कोंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. ही घटना 29 ऑक्टोबर रोजी रात्री 8 ते 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजण्याच्या दरम्यान घडली.
चोरट्याने घरातील कपाटातून 18 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, 9 जोड जोडवे, चांदीचा गणपती, लक्ष्मीची मूर्ती, दोन जोड करंडे तसेच 20 हजार रुपये रोख, असा एकूण 29 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
याबाबत हनुमंत थोरात यांनी 30 ऑक्टोबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 331(4), 305(ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुळजापुरात पार्किंगमधून दुचाकी लंपास
तुळजापूर येथील जगदाळे पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल (एमएच 13 बीके 1824) चोरून नेली. या दुचाकीची अंदाजे किंमत 10 हजार रुपये आहे.
ओमकार गजानन सावंत (वय 24, रा. सुभाषनगर, संतोषीमाता चौक, बार्शी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 ते 1.30 वाजण्याच्या सुमारास कामत हॉटेलच्या पाठीमागील जगदाळे पार्किंगमध्ये दुचाकी उभी करण्यात आली होती. याचदरम्यान अज्ञात व्यक्तीने ती चोरून नेली.
याप्रकरणी 30 ऑक्टोबर रोजी ओमकार सावंत यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुरुममध्ये सोलार प्लेट आणि केबल चोरी
मुरुम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कडदोरा शिवारात अपार कंपनीच्या ठिकाणाहून सोलार प्लेट आणि केबल चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे.
27 ऑक्टोबर रोजी रात्री 11 ते 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने अपार कंपनीची 6 एमएम डीसी रेड अँड ब्लॅक केबल तसेच प्रीमियर एनर्जी कंपनीच्या 610 वॅटच्या 22 सोलार प्लेट, असा एकूण 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी विनोद मधुकर रणखांब (वय 29), नाईनहर्ट फोर्स सेक्युरिटी इंचार्ज, रा. कडदोरा, ता. उमरगा यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात सलग घडलेल्या या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, संबंधित पोलीस ठाण्यांकडून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे.




