धाराशिव: जिल्ह्यात वाहनचोरांचा सुळसुळाट पुन्हा एकदा वाढला असून, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मंदिर परिसरातून आणि शेतातील शेडमधून दोन मोटारसायकली चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी धाराशिव शहर आणि लोहारा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही गुन्हे मंगळवारी (दि. ५ ऑगस्ट) नोंदवण्यात आले.
पहिल्या घटनेत, धाराशिव शहरातील वडगाव येथील मंदिरासमोरून एक मोटारसायकल चोरीला गेली. फिर्यादी धिरज दिलीप सुरवसे (वय २९, रा. नारायण कॉलनी, धाराशिव) यांनी त्यांची काळ्या रंगाची सीबी शाईन मोटारसायकल (क्र. एमएच २५ एएन ९५३३) सोमवारी, दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वडगाव येथील मंदिरासमोर उभी केली होती. अज्ञात चोरट्याने येथून त्यांची सुमारे ३०,००० रुपये किमतीची मोटारसायकल चोरून नेली. याप्रकरणी धिरज सुरवसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत लोहारा तालुक्यातील हराळी येथील एका शेतकऱ्याची मोटारसायकल शेतातून चोरीला गेली. भरत वसंत धाणुरे (वय ३२) यांनी त्यांची होंडा कंपनीची मोटारसायकल (क्र. एमएच २५ एएस ८७१९) दि. २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता त्यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडसमोर लावली होती. दुसऱ्या दिवशी (दि. ३ ऑगस्ट) सकाळी ६ वाजता पाहिले असता, त्यांची सुमारे २०,००० रुपये किमतीची मोटारसायकल जागेवर नव्हती. त्यांनी ५ ऑगस्ट रोजी लोहारा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
दोन्ही प्रकरणांमध्ये, संबंधित पोलीस ठाण्यांनी अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. एकाच दिवशी दोन ठिकाणी वाहनचोरीच्या घटनांची नोंद झाल्याने पोलिसांसमोर चोरांना जेरबंद करण्याचे आव्हान उभे राहिले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.