कधी आभाळ फाटून ओला दुष्काळ, तर कधी ढगांनी पाठ फिरवून कोरडा दुष्काळ—धाराशिव जिल्ह्याच्या नशिबी हा चक्रव्यूह पाचवीलाच पुजलेला आहे. पण निसर्गाच्या या अवकृपेपेक्षाही अधिक भयंकर ठरतो आहे तो इथल्या राज्यकर्त्यांचा कमालीचा कोडगेपणा आणि संवेदनाहीन कारभार. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाचा पत्ता नाही. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले सोयाबीन डोळ्यांदेखत करपून खाक झाले आहे. फळबागा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत आणि भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जनतेची वणवण सुरू आहे, मुक्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आ वासून उभा आहे आणि हाताला काम नसल्याने शेतमजुरांवर पुन्हा एकदा स्थलांतराची कुऱ्हाड कोसळली आहे. सणासुदीचे दिवस असतानाही शेतातल्या नुकसानीमुळे यंदाचा गणेशोत्सव पूर्णपणे थंड आहे आणि आगामी सणांवरही दुष्काळाचे काळे सावट दाटून आले आहे.
अशा भीषण संकटाच्या काळात जिल्ह्याला वाली कोण? हा खरा सवाल आहे. जिल्ह्याचे पालकत्व ठाण्याचे रहिवासी आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे आहे. मात्र, ते धाराशिवचे ‘पालकमंत्री’ आहेत की केवळ ‘झेंडा मंत्री’, असा संतापजनक सवाल आज इथला सामान्य शेतकरी विचारत आहे. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि १७ सप्टेंबरचा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन—केवळ या तीन दिवसांच्या झेंडावंदनापुरते धाराशिवला हजेरी लावायची, शासकीय इतमामात भाषणे ठोकायची आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा मुंबई-ठाण्याची वाट धरायची, एवढाच काय तो यांचा पालकमंत्रिपदाचा आवाका उरला आहे.
जिल्ह्यात सरासरीच्या पन्नास टक्क्यांहून कमी पाऊस झाल्याने परिस्थिती अत्यंत नाजूक बनली आहे. अशा वेळी प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे, प्रशासनाला जागेवर हलवून दुष्काळ निवारणाची कामे सुरू करणे अपेक्षित होते. मात्र, आमचे मंत्री महोदय मुंबईतील वातानुकूलित दालनात बसून ‘ऑनलाइन’ बैठकांचा सोपस्कार पार पाडत आहेत. स्क्रीनवर पाहून शेतकऱ्यांची जळलेली पिके आणि त्यांच्या घरातील कोरडी चूल कशी दिसणार? हवेतील कारभाराने जमिनीवरील दुष्काळ संपत नसतो, याचे भान सत्ताधाऱ्यांना राहिलेले नाही.
धाराशिवची जनता आता कोरड्या आश्वासनांना आणि डिजिटल बैठकांच्या नाटकाला विटली आहे. सत्तेच्या राजकारणात जिल्ह्याला वाऱ्यावर सोडणाऱ्या या ‘पार्ट-टाईम’ कारभाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी—दुष्काळात होरपळणाऱ्या बळीराजाचा आक्रोश जेव्हा रस्त्यावर उतरेल, तेव्हा मंत्र्यांचे हे हायटेक मुखवटे गळून पडल्याशिवाय राहणार नाहीत. पालकमंत्र्यांनी तातडीने जिल्ह्यात तळ ठोकून दुष्काळ जाहीर करावा आणि उपाययोजना राबवाव्यात; अन्यथा केवळ झेंडे फडकवण्यासाठी जिल्ह्याचे पालकत्व मिरवण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार उरत नाही.
- सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह




