विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे, धाराशिव जिल्ह्यातील चार मतदारसंघात वातावरण तापलं आहे. काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांनी एकत्र महाविकास आघाडी केली आहे, पण वाटणी पाहता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ‘हम दिल दे चुके सनम’ची आठवण आली असावी.
धाराशिव, परंडा, आणि उमरगा हे तीन मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळाले, तर तुळजापूर काँग्रेसला गेला. राष्ट्रवादीच्या हाती मात्र… अहो, काहीच नाही! नाहीच म्हणता का? होय, होय, संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या पोटात फुलपाखरं उडवणारं एकही मतदारसंघ नाही.
परंड्यातील माजी आमदार राहुल भैय्या मोटे, ज्यांनी हॅटट्रिक मारली होती, ते आत्तापर्यंत गालातल्या गालात स्मित करत होते. पण आता शिवसेनेनं रणजित पाटील यांना तिकिट दिल्यानं राहुल भैय्या हिरमुसले. असं म्हणतात की, त्यांच्या तंबूत ‘राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी’ ऐवजी ‘वाजवा हार्मोनियम’च्या आवाजात नाराजीचा सूर लागलाय.
दरम्यान, तुळजापूर मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे दोन शिलेदार – जिल्हाध्यक्ष संजय दुधगावकर आणि माजी जिल्हाध्यक्ष संजय निंबाळकर यांनी खूप प्रयत्न केले. पत्रकारांना बकरा कापून मटण पार्टी दिली, मोठ्या बातम्याही दिल्या, पण अखेर काँग्रेसचा हात वर राहिला. राष्ट्रवादीच्या या शिलेदारांची हौस मटण पार्टीतच उरली, मतदारसंघ मात्र हातून गेला!
अता राष्ट्रवादीचं तुतारीचं चिन्ह, आणि “राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी” ही टॅगलाईन कुठे? कारण धाराशिवमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणतात, “राम कृष्ण हरी, वाजवा पिपाणी, तेही पिंपळ पानांची!”
तर मंडळी, पहा आता धाराशिवमधल्या निवडणूक रणांगणात अजून काय काय ‘तुताऱ्या’ आणि ‘पिपाण्या’ वाजणार ते!