धाराशिव : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांसाठी महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्चित झाले आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाला तीन तर काँग्रेसला एक मतदारसंघ देण्यात आला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार) एकही जागा मिळालेली नाही.
महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी धाराशिव जिल्ह्यातील तीन मतदारसंघांचा ताबा शिवसेना (ठाकरे गट ) कडे दिल्याचे संकेत दिले होते, आणि आता हे वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे.
धाराशिव लाईव्हने २३ सप्टेंबर रोजी दिलेल्या वृत्तात ठाकरे गटाला धाराशिव जिल्ह्यात तीन मतदारसंघ मिळण्याची शक्यता वर्तवली होती, जे आता प्रत्यक्षात आले आहे.
धाराशिव मतदारसंघातून विद्यमान आमदार कैलास पाटील, परंडा मतदारसंघातून रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमरगा येथून प्रवीण स्वामी यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर आहे. तुळजापूर मतदारसंघ काँग्रेसकडे सोडण्यात आला असून, त्यातून धीरज पाटील किंवा अशोक जगदाळे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीच्या या जागा वाटपामुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाविकास आघाडी : धाराशिव जिल्ह्यातील तीन मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला