धाराशिव: शासकीय रुग्णालयात बनावट औषधे तयार करून, ती खरी असल्याचे भासवून पुरवठा करत शासनाची आणि रुग्णांच्या आरोग्याची गंभीर फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या महिला अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून, लातूर आणि ठाणे येथील चार व्यक्तींविरुद्ध धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षक, श्रीमती स्वाती कल्याणराव कुपकर (वय ४२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, धाराशिव येथील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या औषध भांडारात दिनांक ४ ऑक्टोबर २०२४ ते १९ डिसेंबर २०२४ या कालावधीत हा गंभीर प्रकार घडला. आरोपींनी संगनमत करून बनावट औषधांची निर्मिती केली. ही औषधे मानवी आरोग्यास धोकादायक ठरू शकतात, याची पूर्ण कल्पना असूनही आरोपींनी खोटी कागदपत्रे तयार केली. बनावट कंपन्यांच्या नावे ही निकृष्ट आणि बनावट औषधे शासकीय रुग्णालयात पुरवून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली, तसेच रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण केला.
श्रीमती कुपकर यांनी ८ एप्रिल २०२५ रोजी रात्री उशिरा दिलेल्या सविस्तर फिर्यादी जबाबावरून, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये:
१) महादेवी धोंडीबा मुळे (रा. मे. जया एंटरप्राइजेस, दुकान नं. ११, भालचंद्र रक्तकेंद्र, गांधी मार्केट, लातूर)
२) हेमंत डी. मुळे (रा. मे. जया एंटरप्राइजेस, लातूर)
३) मिहीर त्रिवेदी (रा. मे. अॅक्टीवेन्टीस बायोटेक प्रा. लि., कशेली, भिवंडी, ठाणे)
४) विजय शैलेंद्र चौधरी (रा. मे. काबीज जनरीक हाउस, दुकान नं. २२, पुनम विहार, मिरा रोड, ठाणे)
या चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (B.N.S) कलम ३१८(४) (घातक पदार्थाची भेसळ), ३३६(३) (मानवी जीव धोक्यात घालणारे कृत्य), ३४०(२) (फसवणूक करण्याच्या हेतूने खोटे दस्तऐवज तयार करणे), २७८ (सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणे) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर नंबर १५७/२०२५).
हा प्रकार अत्यंत गंभीर असून, बनावट औषधांच्या पुरवठ्याने रुग्णांच्या जीवाशी खेळ मांडला गेला आहे. पोलीस निरीक्षक शेख यांच्या आदेशानुसार, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करत आहेत. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
याप्रकरणी संपादकीय लेख वाचा -क्लिक करा
आरोग्याच्या बाजारातले सैतान! धाराशिवमधील बनावट औषध प्रकरण एका भीषण वास्तवाचे दर्शन