धाराशिव – केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना यावर्षीचे दुष्काळी अनुदान द्या अन्यथा 24 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर आज पासून दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर पडत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी दिली.
राज्य शासनाने 31 ऑक्टोबर 2023 रोजी शासन निर्णय काढून राज्यातील 40 तालुक्यांमध्ये गंभीर व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला होता त्यात धाराशिव जिल्ह्यातील लोहारा, वाशी, धाराशिव यातील तालुक्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला होता. या तीन तालुक्यातील एक लाख 64 हजार 259 शेतकऱ्यांना 208 कोटी 50 लाख रुपये दुष्काळी अनुदान जाहीर केले होते.
शासन निर्णयानुसार सर्वच शेतकऱ्यांना केवायसी करणे बंधनकारक केले होते, त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती मात्र केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही केवळ एक लाख तीन हजार 825 शेतकऱ्यांनाच 122 कोटी 13 लाख 4 हजार रुपये चे वितरण करण्यात आलेले होते. केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या जवळपास 41 हजार 570 शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मिळत नव्हते त्यासाठी अनिल जगताप यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन 19 तारखेपर्यंत सदरील अनुदान जमा करावे अन्यथा 24 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
आज दुपारपासूनच अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यावर दुष्काळी अनुदान जमा झाले असल्याचा बँकांचा संदेश आला आहे. आंदोलनाचा इशारा देताच शासन व प्रशासनाला उशिरा का होईना जाग आली याचा मनातून आनंद होत असल्याची प्रतिक्रिया अनिल जगताप यांनी दिली आहे .