धाराशिव – पोलिसात तक्रार दाखल केल्याचा राग मनात धरून सात जणांच्या जमावाने एका व्यक्तीला आणि त्याच्या मुलीला काठी व दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना धाराशिव तालुक्यातील कौडगाव तांडा येथे घडली आहे. ही घटना २७ एप्रिल रोजी सायंकाळी घडली असून, याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
विजय गणेश राठोड (वय ४८ वर्षे, रा. कौडगाव तांडा, ता. जि. धाराशिव) यांनी २८ एप्रिल रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, २७ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास कौडगाव तांडा येथे आरोपी भारत दिलीप राठोड, सतिष दिलीप राठोड, अभिषेक एकनाथ पवार, दिनेश भारत राठोड, सविता भारत राठोड, शाहुबाई एकनाथ पवार आणि विमल दिलीप राठोड (सर्व रा. कौडगाव तांडा) यांनी गैरकायदेशीर जमाव जमवला.
‘पोलिसात तक्रार का दिली?’ असे म्हणत आरोपींनी विजय राठोड व त्यांची मुलगी पुजा यांना शिवीगाळ केली. तसेच, जमावाने त्यांना लाथाबुक्क्यांनी, काठीने आणि दगडाने मारहाण करून जखमी केले. याशिवाय, आरोपींनी विजय राठोड आणि त्यांच्या मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली, असेही फिर्यादीत म्हटले आहे.
विजय राठोड यांच्या तक्रारीवरून धाराशिव ग्रामीण पोलिसांनी सातही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(३), १८९(२), १९१(२), १९० अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.