धाराशिव – शहरातील काही तरुणांनी आपली बुलेट गाडी ‘रॉकेट’ समजून रस्त्यांवर धुडगूस घालायला सुरुवात केली आहे. आवाज असा की जणू काही स्फोटक चाचण्या चालू आहेत, आणि रस्त्यावरची माणसं धडधडीत एक्स्पेरिमेंटचे गिनीपीग! पण गंमत अशी की, या कानफाट्या फटाका सायलेन्सरच्या आवाजाने जसे नागरिक दचकतात, तसेच पोलीसही गोंधळून फक्त पाहत बसतात.
बुलेटवाल्यांचा हा ‘धडाकेबाज’ कार्यक्रम खासकरून महाविद्यालयीन परिसरात जोरात सुरू आहे. तिथल्या विद्यार्थिनींची अवस्था अशी की, ‘भीती वाटते पण तक्रार करायची कुणाकडे?’ कारण, ज्यांच्याकडे करायची, तेच बहुदा ‘आम्ही बघतोय’ या आविर्भावात असतात.
शहरात वेगाने वाढणाऱ्या या ‘धडधडपट्टी’मुळे वाहनधारकांनी आपले कान आणि संयम गमावले आहेत. एखाद्या वेळी असा आवाज आला की वाटतं, ‘धड काहीतरी फुटलं!’ पण प्रत्यक्षात असतो तो कुठल्या तरी ‘रोडरोमियो’चा सायलेन्सरमुक्त स्टंट!
पोलिसांनी मात्र या प्रकरणाकडे अगदी ‘साउंड प्रूफ’ भूमिकेत पाहिलं आहे. त्यांची मानसिकता अशी दिसते की, ‘आवाज तर फक्त एक सेकंद येतो, पण त्यावर कारवाई करायला आमच्याकडे वेळ कुठे?’ त्यामुळे सामान्य नागरिकांनी आता स्वतःच ‘साउंड पोलिसिंग’ सुरू करावी की काय, असा विचार चालू आहे.
शेवटी प्रश्न हा आहे की, ‘पोलिसांनी अशा धडाकेबाज गाड्यांवर लगाम कधी घालायचा?’ की पुढच्या वेळी फटाका सायलेन्सरच्या आवाजाने कोणी खरोखर खाली पडलं की मगच हालचाल करणार? धाराशिवकर उत्सुकतेने उत्तराच्या प्रतीक्षेत आहेत!