धाराशिव: जिल्ह्यात भूम, परंडा आणि वाशी तालुक्यात झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक गावांना पुराचा वेढा पडला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. भूम तालुक्यातील चिंचोली येथे एका वृद्ध महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून, शेकडो जनावरे दगावली आहेत. प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून, एनडीआरएफ आणि लष्कराची मदत घेण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भूम तालुक्यातील चिंचोली येथील देवगनाबाई नवनाथ वारे (वय ७०) यांच्या राहत्या शेडमध्ये पुराचे पाणी शिरल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अनेक गावांमध्ये नागरिक अडकले, बचावकार्य सुरू
प्रशानाने तातडीने बचावकार्य हाती घेतले असून, भूम तालुक्यातील तांबेवाडी येथून ६, इट येथून १ आणि इडा येथून ७ अशा एकूण १४ व्यक्तींना पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
याशिवाय, लाखी गावातील १२ लोकांना बोटीच्या साहाय्याने, तर देवगाव येथील तब्बल २८ व्यक्तींना हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. रुई गावातील १३ लोकांनाही बोटीने बाहेर काढण्यात आले आहे.
परंडा तालुक्यातील घाटपिंपरी, वागेगव्हाण आणि वडनेर या गावांमध्येही अनेक नागरिक अडकले असून, त्यांच्या बचावासाठी एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता लष्कराच्या पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.
शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान, अनेक जनावरे दगावली
जिल्ह्यातील भूम आणि परांडा तालुक्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान झाले असून, विशेषतः बेलगाव पिंपळगाव येथील एका शेतकऱ्याला मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे त्यांचे तब्बल २७ गायी, २० शेळ्या आणि इतर पशुधन मृत्युमुखी पडले किंवा वाहून गेले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. बेलगाव पिंपळगाव येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्यात पाणी शिरल्याने मोठे संकट ओढावले. या पुराच्या पाण्यात त्यांच्या १० गायी वाहून गेल्या, तर १७ गायींचा जागीच मृत्यू झाला. यासोबतच २० शेळ्या आणि इतर पशुधनाचाही समावेश आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
एवढी मोठी हानी होऊनही प्रशासन केवळ “पंचनामे करू” असे आश्वासन देत वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, याबद्दल शेतकऱ्यांमध्ये संतापाचे आणि नैराश्याचे वातावरण आहे. “दरवेळी कागदी घोडे नाचवले जातात, निकष लावले जातात आणि अखेरीस शेतकरीच मदतीपासून वंचित राहतो,” अशी संतप्त प्रतिक्रिया एका स्थानिक नागरिकाने दिली.
बचावकार्य युद्धपातळीवर, जिल्हाधिकारी स्वतः घटनास्थळी;
६४ हजार शेतकऱ्यांचे ६२ हजार हेक्टरवरील पीक पाण्याखाली
धाराशिव: जिल्ह्यात ढगफुटीसदृश पावसाने निर्माण झालेली पूरस्थिती अद्यापही गंभीर असून, प्रशासनाकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. परंडा तालुक्यातून अंदाजे १५० व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम चालू असून, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार स्वतः घटनास्थळी तळ ठोकून आहेत. या महापुराचा शेतीलाही मोठा फटका बसला असून, जिल्ह्यातील तब्बल ६४ हजार शेतकऱ्यांचे ६२ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पीक पाण्याखाली गेले आहे.
बचावकार्याला वेग; वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी
परंडा तालुक्यातील पूरग्रस्त भागात बचावकार्य वेगाने सुरू आहे. आतापर्यंत ढग पिंपरी येथून ६ लोकांची सुखरूप सुटका करण्यात आली असून, वागेगव्हाण आणि कपिलापुरी येथे बचावकार्य चालू आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्यासह उपजिल्हाधिकारी धरम कर, उपजिल्हाधिकारी यादव, परिविक्षाधीन आयएएस अधिकारी डोंगरे, परंड्याचे तहसीलदार काकडे हे वरिष्ठ अधिकारी बचाव मोहिमेत सहभागी झाले आहेत. एनडीआरएफ (NDRF) आणि लष्कराची पथकेही अथक परिश्रम घेत आहेत.
शेतीचे प्रचंड नुकसान, ९२ गावे बाधित
दिनांक २० सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२५ या तीन दिवसांत झालेल्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या प्राथमिक अंदाजानुसार:
- बाधित गावे: ९२
- बाधित शेतकरी: ६४,०२९
- नुकसान क्षेत्र (जिरायत): ६२,९८५ हेक्टर
- नुकसान क्षेत्र (बागायत): ४.०० हेक्टर
- एकूण नुकसानग्रस्त क्षेत्र: ६२,९८९ हेक्टर
ही आकडेवारी प्राथमिक स्वरूपाची असून, पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा नेमका आकडा समोर येईल, असे प्रशासनाने म्हटले आहे.
यापूर्वीच्या माहितीनुसार, भूम तालुक्यातील चिंचोली येथे देवगनाबाई नवनाथ वारे (वय ७०) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता, तर शेकडो जनावरे दगावली होती. आतापर्यंत लाखी, देवगाव आणि रुई या गावांतून हेलिकॉप्टर आणि बोटींच्या साहाय्याने ५३ हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचवण्यात आले आहे. प्रशासन नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन करत आहे.
परंडा तालुक्यात पुरात अडकलेल्या २७ नागरिकांना खासदार ओमराजे निंबाळकरांच्या प्रयत्नाने लष्कराच्या हेलिकॉप्टरने वाचवले
परंडा तालुक्यातील लाखी गावात अतिवृष्टीमुळे पुरात अडकलेल्या २७ नागरिकांना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या जलद प्रयत्नांमुळे लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. आज पहाटेपासून सुरू झालेल्या या थरारक बचावकार्याला दुपारी यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ३ वाजताच्या सुमारास लाखी गावातील पिंगळे कुटुंबातील एका मुलीने, तसेच जिल्हाप्रमुख रणजीत ज्ञानेश्वर पाटील व मेघराज पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना संपर्क साधून काही नागरिक पुरात अडकल्याची माहिती दिली. यामध्ये १३ महिला, २ लहान मुले आणि १२ पुरुषांचा समावेश होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून खासदार निंबाळकर यांनी तात्काळ सूत्रे हलवली. पहाटे ४ वाजताच्या सुमारास त्यांनी धाराशिवच्या जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी नाशिक येथील 201 आर्मी एव्हिएशन स्क्वाड्रनचे कर्नल अक्षय कुमार सिंग यांच्याशी चर्चा करून लष्कराच्या हेलिकॉप्टरची मदत मागितली.
सततच्या पाठपुराव्यानंतर, दुपारी १२ वाजता लष्कराचे हेलिकॉप्टर घटनास्थळी दाखल झाले. कमांडिंग ऑफिसर पायलट लेफ्टिनेंट कर्नल करण बरार आणि मेजर देवांश यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अत्यंत कठीण परिस्थितीत अडकलेल्या सर्व २७ नागरिकांना हेलिकॉप्टरद्वारे यशस्वीरित्या बाहेर काढले.
या यशस्वी बचावकार्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रशासनातील सर्व अधिकारी आणि हेलिकॉप्टर सेवा पुरवणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले व त्यांच्या कार्याचे अभिनंदन केले. तसेच, जिल्ह्यात अन्य ठिकाणी असे कोणी नागरिक अडकले असल्यास त्यांनी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या घटनेमुळे खासदार निंबाळकर यांच्या तत्परतेचे आणि प्रशासनाच्या समन्वयाचे कौतुक होत आहे.
परंडा तालुक्यात पूरस्थिती: लाखी आणि नरसाळे वस्तीतील नागरिकांची हेलिकॉप्टरद्वारे सुटका
परंडा तालुक्यातील लाखी आणि नरसाळे वस्ती परिसरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या अनेक नागरिकांना हेलिकॉप्टर व बोटीच्या साहाय्याने सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. प्रशासनाने तातडीने बचाव मोहीम राबवून अडकलेल्या नागरिकांना यशस्वीरित्या बाहेर काढले.
मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, लाखी आणि नरसाळे वस्तीला पुराच्या पाण्याने वेढा दिला होता. अनेक कुटुंबे घरातच अडकून पडली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तात्काळ बचाव कार्याला सुरुवात केली.
या मोहिमेत हेलिकॉप्टरच्या मदतीने काही नागरिकांना एअरलिफ्ट करण्यात आले, तर बोटींच्या साहाय्याने इतरांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, “या कठीण काळात नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. मदतकार्य सुरळीत सुरू असून, मी स्वतः नागरिकांशी सतत संपर्कात आहे.”
आपत्कालीन मदतीसाठी संपर्क क्रमांक
प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास किंवा मदतीची गरज भासल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी खालील संपर्क क्रमांक जारी करण्यात आले आहेत:
- ९९७०९४६८१०
- ९१०४२५२५२५
“सर्व सरकारी यंत्रणा आपल्या मदतीसाठी सज्ज आहेत. कृपया आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्या,” असे आवाहनही प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
वाशी तालुक्यातील पांगरी गावाचा संपर्क तुटला, हातोली नदीला पूर
पुलावरून पाणी वाहत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
वाशी तालुक्यातील पांगरी गावाचा हातोली नदीला आलेल्या पुरामुळे संपर्क तुटला आहे. नदीच्या पुलावरून पाणी वाहत असून, पूल वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे हातोली नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे पांगरी गावाला पुराचा वेढा पडला आहे. गावाला जोडणाऱ्या मुख्य पुलावरून पाणी वेगाने वाहत असल्याने गावाचा इतर भागांशी संपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे. पुलाची अवस्था पाहता तो कोणत्याही क्षणी वाहून जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
गावकऱ्यांच्या सतर्कतेने जनावरांचे प्राण वाचले
पुराच्या पाण्यात काही जनावरे अडकली होती. मात्र, गावकऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत आणि एकजुटीने या जनावरांना सुखरूप बाहेर काढले. गावकऱ्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पाणी पातळी वाढण्याची शक्यता
नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना आणि विशेषतः पांगरी गावातील नागरिकांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गरज पडल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून, संभाव्य धोका टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.
भूम, परंडा तालुक्यात जलप्रलय: लष्कर, NDRF कडून बचावकार्य युद्धपातळीवर; शेतीचे मोठे नुकसान
धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि परंडा तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या विक्रमी पावसामुळे महापुराने थैमान घातले आहे. या दोन तालुक्यांतील परिस्थिती अत्यंत गंभीर असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. आतापर्यंत ९२ गावे बाधित झाली असून, ६२ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. पूरग्रस्त भागात लष्कर, एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफच्या (SDRF) तुकड्या दाखल झाल्या असून हेलिकॉप्टर व बोटींच्या सहाय्याने बचावकार्य वेगाने सुरू आहे.
बचाव पथकांची शर्थीची झुंज
बचाव पथकांनी हेलिकॉप्टर आणि बोटींच्या साहाय्याने आतापर्यंत ६५ हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. यामध्ये वडनेर-देवगाव (खु.) येथील २६ जणांना हेलिकॉप्टरने, तर लाखी आणि रुई गावातील २५ जणांना बोटीने बाहेर काढण्यात आले. भूम तालुक्यातील तांबेवाडी, इट आणि इडा येथूनही १४ जणांची सुटका करण्यात आली आहे. परंडा तालुक्यातील घाटपिंपरी, वागेगव्हाण आणि वडनेर परिसरातून जवानांनी सुमारे १५० नागरिकांना वाचवले.
प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी
परंड्याचे आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी देवगाव (खु.) येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व नुकसानीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार स्वतः पूरग्रस्त भागात तळ ठोकून आहेत आणि त्यांनी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश दिले आहेत. महसूल, पोलीस आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभाग बचाव आणि मदतकार्यात गुंतले आहेत.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
या महापुराचा सर्वात मोठा फटका शेतीला बसला आहे. प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार, जिल्ह्यातील ९२ गावांमधील ६४,०२९ शेतकऱ्यांचे ६२,९८९ हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली आहेत. यामध्ये प्रामुख्याने जिरायत पिकांचा समावेश आहे. भूम तालुक्यात अतिवृष्टीमुळे वारेवडगाव, हिवरडा, वालवड यांसह अनेक पाझर तलाव फुटल्याने पूरस्थिती आणखी बिकट झाली आहे.
हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा
दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी आपली जनावरे आणि कुटुंबियांसह तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.