धाराशिव: जिल्ह्यात पोलीस अधीक्षक बदलताच प्रशासनाचा हिसका काय असतो, याचा अनुभव धाराशिवकर घेत आहेत. निष्क्रियतेचा शिक्का बसलेल्या पोलीस अधीक्षकांची बदली होताच, सांगलीहून आलेल्या नूतन पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी सूत्रे हाती घेताच केवळ आठ दिवसांत जिल्ह्याची हवा बदलली आहे. आतापर्यंत ‘चिरीमिरी’ घेऊन गप्प बसणारे पोलीस खाते अचानक ‘ऍक्शन मोड’वर आले असून, गांजा पिणाऱ्या आणि विकणाऱ्यांचा जिल्हाभरात अक्षरशः थरकाप उडाला आहे.
रुजू होताच खोखर यांनी अंमली पदार्थांविरोधात धडक कारवाईचे सक्त आदेश दिले आणि गेल्या आठवड्यापासून सुस्त असलेले पोलीस दल कामाला लागले. परंडा, वाशी, येरमाळा आणि धाराशिव शहरात झालेल्या चार मोठ्या कारवायांत पोलिसांनी तब्बल १० किलो ९६७ ग्रॅम (जवळपास ११ किलो) गांजा जप्त केला असून, अनेक बड्या विक्रेत्यांसह सेवन करणाऱ्यांनाही गजाआड केले आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात गांजाचा अवैध धंदा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
असा आहे कारवाईचा धडाका:
१. परंडा: थेट SP ना गुगल मॅप लोकेशन, अन् ९ जण जाळ्यात!
एका अज्ञात खबऱ्याने थेट नूतन पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनाच गुगल मॅप लोकेशन पाठवून परंड्यात गांजा विक्री सुरू असल्याची माहिती दिली. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी, २७ मे रोजी सरकारी दवाखान्यामागे छापा टाकला. या कारवाईत विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्या फारूख हबीब सय्यद याच्यासह ९ जणांना गांजा सेवन करताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून ९६७ ग्रॅम गांजा आणि चिलीम जप्त करण्यात आल्या.
२. वाशी: घरातच गांजाचे गोदाम? ७ किलोचा साठा जप्त, आरोपी फरार!
वाशी तालुक्यातील लाखनगाव येथे तर हद्दच झाली. फुलचंद साहेबा शिंदे नावाच्या इसमाने चक्क आपल्या राहत्या घरातच गांजाचे गोदाम थाटले होते. गुरुवारी, २९ मे रोजी पहाटे वाशी पोलिसांनी छापा टाकला असता, घरातून तब्बल १ लाख ४० हजार रुपये किमतीचा ७ किलो १० ग्रॅम ओला व सुका गांजा जप्त करण्यात आला. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच मुख्य आरोपी फुलचंद शिंदे फरार होण्यात यशस्वी झाला.
३. येरमाळा: पत्र्याच्या शेडमधील अड्डा उद्ध्वस्त!
येरमाळ्यातील छत्रपती संभाजी नगर परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये गांजा विक्री करणाऱ्या विजय अशोक शिंदे याला पोलिसांनी शुक्रवारी, ३० मे रोजी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून २०,००० रुपये किमतीचा ८५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. आरोपी अपंग असल्याने आणि गुन्ह्यात कमी शिक्षेची तरतूद असल्याने, त्याला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नोटीस देऊन सोडण्यात आले.
४. धाराशिव शहर: टोळीचा पर्दाफाश, विक्रेता आणि गिऱ्हाईक सगळेच गजाआड!
शुक्रवारी रात्री उशिरा धाराशिव शहर पोलिसांनी भोसले हायस्कूलमागे एका घरात छापा टाकून मोठी कारवाई केली. मुख्य विक्रेता कुणाल अनिल पवार याच्यासह जिशान अली, विपुल खोब्रे, शाहरुख मुजावर आणि ओमकार शिंदे या चार ग्राहकांना गांजा सेवन करताना अटक करण्यात आली. या टोळीकडून २ किलो ५० ग्रॅम गांजा आणि रोख रकमेसह एकूण ४७,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नूतन पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या धडाकेबाज सुरुवातीमुळे जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे कंबरडे मोडले आहे. पोलीस प्रशासनाच्या या नव्या ‘पॅटर्न’चे सामान्य नागरिकांमधून स्वागत होत आहे. ही तर केवळ सुरुवात असून, आगामी काळात आणखी मोठ्या कारवाया अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे.