धाराशिव: शहरातील वाढत्या प्रदूषणाविरोधात आणि कचरा डेपो स्थलांतराच्या मागणीसाठी आज धाराशिवकरांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले. धारासुर मर्दिनी कमानीजवळ रास्ता रोको करत संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा जोरदार निषेध केला.
“कचरा डेपो हटवा, शहर प्रदूषणमुक्त करा!”
आंदोलकांनी “कचरा डेपो हटवा – नागरिकांना वाचवा!”, “शहर प्रदूषणमुक्त करा!” अशा जोरदार घोषणा देत प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. शहरभर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, त्यामुळे दुर्गंधी, डासांची संख्या वाढणे आणि आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.
शहराच्या आरोग्याचा मुद्दा – प्रशासन अजूनही सुस्त!
शहरातील देशपांडे स्टँडजवळील कचरा डेपोमधून सातत्याने निघणारा धूर आणि दुर्गंधी यामुळे उमर मोहल्ला, ख्वाजा नगर, गणेश नगर, दरगाह रोड, आयुर्वेदिक महाविद्यालय परिसर, अहिल्याबाई होळकर चौक, बस डेपो परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
धुरामुळे श्वसनाचे त्रास, खोकला, डोळ्यांची जळजळ, त्वचेचे आजार यासारख्या तक्रारी वाढल्या आहेत. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आजारी नागरिकांवर या प्रदूषणाचा मोठा परिणाम होत आहे.
“ताबडतोब निर्णय घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन!”
आंदोलकांनी स्पष्ट शब्दांत प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर तातडीने कचरा डेपो शहराच्या बाहेर स्थलांतरित केला नाही, तर यापेक्षा मोठे आंदोलन उभारले जाईल.
सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरपरिषद आणि जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “८ कोटींच्या स्वच्छता टेंडरचा मलिदा तर खाताय, पण नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालता!” अशा तीव्र शब्दांत आंदोलकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
नगरपरिषदेला ४८ तासांची अल्टीमेटम!
यावेळी आंदोलकांनी नगरपरिषद प्रशासनाला ४८ तासांत ठोस निर्णय घेण्याचा अल्टीमेटम दिला आहे. “जर या मुदतीत काही निर्णय झाला नाही, तर शहरभर आंदोलन छेडले जाईल, जबाबदारी प्रशासनाची असेल!” असा इशारा देण्यात आला आहे.
धाराशिवकरांसाठी निर्णायक क्षण – प्रशासन काय निर्णय घेते?
आजच्या या ऐतिहासिक आंदोलनामुळे प्रशासनावर मोठा दबाव आला आहे. धाराशिवकर आता निर्णायक लढ्यात उतरत असून, कचरा डेपो हटेपर्यंत शांत बसणार नाहीत!
आता प्रशासन खरोखर कृती करणार की नेहमीसारखी टोलवाटोलवी करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे!
Video