धाराशिव – जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या धाराशिव शहरात सध्या कचरा आणि नाली सफाईच्या समस्येने उग्र रूप धारण केले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दीड लाख लोकसंख्या आणि नव्वद हजार मतदार असलेल्या या शहरात गेल्या तीन वर्षांपासून पालिकेवर प्रशासकाचे राज्य आहे. येत्या चार महिन्यांत निवडणुका तोंडावर असताना दुसरीकडे पालिका प्रशासनातील भ्रष्टाचार उघडकीस येत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहरातील कचरा आणि नाली सफाईचे काम बारामतीच्या एका कंत्राटदाराला वार्षिक तब्बल आठ कोटी रुपयांना देण्यात आले आहे. मात्र, पालिका कर्मचारी आणि कंत्राटदार यांच्या अभद्र युतीमुळे शहराचे आरोग्य रामभरोसे झाले आहे. नियमानुसार प्रत्येक प्रभागात किमान १० ते १२ कामगार, म्हणजेच एकूण १९ प्रभागांसाठी सुमारे २०० कामगार नेमणे बंधनकारक असताना, प्रत्यक्षात केवळ ३० ते ४० कर्मचारीच कार्यरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अनेक प्रभागांमध्ये तर एकही कामगार फिरकत नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, नागरिकांनी तक्रार केल्यास तात्पुरती मलमपट्टी म्हणून कामगार पाठवले जातात. मात्र, नाली साफ करणे किंवा कचरा उचलल्यानंतर हेच कामगार नागरिकांकडून पैशांची मागणी करत असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. यावरून प्रशासकीय यंत्रणा किती पोखरली गेली आहे, याचा अंदाज येतो.
या भ्रष्टाचाराचा कळस म्हणजे, बोगस हजेरीपट दाखवून कंत्राटदारामार्फत कोट्यवधी रुपयांची देयके उचलली जात असल्याचा आरोप होत आहे. कामगारांना वेळेवर पगार मिळत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून कचरा उचलणे आणि नाली साफ करणे पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ ही घोषणा केवळ कागदावरच उरली असून, शहरवासीयांना दुर्गंधी आणि रोगराईचा सामना करावा लागत आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी तातडीने चौकशी करून दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. निवडणुकीच्या तोंडावर प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, याचे पडसाद आगामी निवडणुकीत उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.