धाराशिव: शहरवासीयांच्या मनोरंजनासाठी आणि पर्यटन विकासाच्या नावाखाली हातलादेवी तलावाच्या काठावर १ कोटी रुपये खर्चून ‘बसविण्यात’ आलेले संगीत कारंजे अचानक ‘चोरीला’ गेल्याची धक्कादायक (आणि तितकीच हास्यास्पद) घटना तीन वर्षांपूर्वी उघडकीस आली होती. विशेष म्हणजे, हे संगीत कारंजे प्रत्यक्षात कधी बसवलेच गेले नव्हते, असा दावा केला जात असून, केवळ कागदोपत्री घोडे नाचवून निधी हडप केल्याचा आरोप होत आहे.
‘संगीत’ गायब, ‘कारंजे’ अदृश्य, बिल मात्र ‘ओके’!
काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या पर्यटन विकास निधीतून हातलादेवी तलावाच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी आणि नागरिकांना संगीतमय कारंज्यांचा मनमुराद आनंद लुटता यावा यासाठी तब्बल १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. कामाचे बिलही अदा करण्यात आले. मात्र, जेव्हा या ‘भव्यदिव्य’ प्रकल्पाबद्दल तक्रारींचा सूर उमटू लागला, तेव्हा अचानक हे संगीत कारंजे चोरीला गेल्याची तक्रार उघडकीस पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. जणू काही चोरट्यांनी रात्रीतून भलामोठा कारंजा उचलून नेला आणि कोणाला पत्ताही लागला नाही!
पोलिसांची ‘अंधारात’ शोधमोहीम!
तक्रार दाखल होताच पोलिसांनी चोरांना शोधण्यासाठी ‘कंबर कसली’. मात्र, जिथे कारंजेच नव्हते, तिथे चोर कसे सापडणार? पोलिसांनी हातलादेवी तलावाचा परिसर पिंजून काढला, खबऱ्यांचे जाळे विणले, पण उपयोग शून्य! कारण, सत्य तर हे होते की, तिथे ना कधी संगीत घुमले, ना कधी पाण्याचे फवारे उडाले. एका बोगस कंत्राटदाराला हाताशी धरून हा संपूर्ण निधी अलगदपणे कोणाच्या तरी खिशात विसावला होता. त्यामुळे पोलिसांची ही शोधमोहीम म्हणजे ‘अंधारात सुई शोधण्यासारखी’ ठरली.
तो ‘हात की सफाई’ करणारा जादूगार कोण?
आता प्रश्न हा आहे की, हा १ कोटीचा ‘हात की सफाई’ करणारा तो जादूगार कोण? ज्याने न बसवलेल्या कारंज्याचे बिल उचलले आणि आता सगळेच हात वर करत आहेत. या प्रकरणाचा तपास नेमका कोणत्या दिशेने जाणार, की हा ‘फाइल बंद’ प्रकरणांच्या यादीत जमा होणार, हे येणारा काळच ठरवेल.
निवडणुकीच्या तोंडावर ‘कारंज्याचा’ मुद्दा गाजणार!
लवकरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे हा ‘गायब’ झालेल्या संगीत कारंज्याचा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची एकही संधी सोडणार नाहीत, हे नक्की. त्यामुळे या निवडणुकीत मतदारांना आश्वासनांच्या फवाऱ्यांखाली या ‘अदृश्य’ कारंज्याची आठवण करून दिली जाईल, यात शंका नाही.
धाराशिवकर मात्र अजूनही त्या संगीत कारंज्याची वाट पाहत आहेत, ज्याच्या नावाने त्यांच्या करातून १ कोटी रुपये खर्च झाले. कदाचित, ते कारंजे कोणत्या तरी अदृश्य जगात संगीताच्या तालावर थुईथुई नाचत असेल!