धाराशिव – धाराशिव शहरात दिवसाढवळ्या महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून नेण्याच्या घटना एवढ्या वाढल्या आहेत की लवकरच ‘सोन्याचे गंठण स्पर्धा’ जाहीर करण्यात येईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा कोणत्याही अधिकृत संस्थेने नव्हे, तर चोरांनीच सुरू केलेली दिसते!
आठवड्यातून तीन-चार महिलांचे गंठण हिसकावून पसार होण्याचे प्रमाण पाहता, चोरांच्या संघटनेने हे ‘धंदे’ व्यवस्थित व्यवस्थापित केले आहेत. घटनांचा अभ्यास केल्यास असे दिसते की हे सर्व प्रकार आनंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच होत आहेत. त्यामुळे ‘पोलिसांच्या देखरेखीखाली’ चोर अधिक सुरक्षित असल्याचा अंदाज लावला जात आहे.
चोरांना सीसीटीव्हीचे भय नाही!
शहरात सीसीटीव्ही असल्याचा दावा पोलीस करतात, पण सीसीटीव्हीमध्ये आरोपी दिसतच नाहीत. कारण काय? कदाचित चोरांनी ‘नादानगिरी’ सोडून आता तंत्रज्ञानावर पकड मिळवली असावी! एवढेच नव्हे, तर आनंदनगर पोलिसांचा ‘चोरांवर हात राखून ठेवण्याचा’ अलिखित करार असल्याची चर्चाही रंगली आहे.
महिलांमध्ये भीती, पोलिसांना सुट्टी?
महिलांनी गळ्यात गंठण , सोन्याचे दागिने घालायचे की नाही, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काहींनी तर सोन्याच्या ऐवजी पितळेच्या चेन घालण्याचा नवा ट्रेंड सुरू केला आहे. पण पोलीस मात्र अजूनही “गुन्ह्याची नोंद झाली आहे, तपास सुरू आहे” या ठराविक स्क्रिप्टवर ठाम आहेत.
गंठण चोर – सुपरफास्ट सेवा!
ताज्या घटनांमध्ये भक्ती साळुंके आणि मनिषा शेवाळे यांना जबरी चोरीचा फटका बसला आहे. अवघ्या काही सेकंदांत दुचाकीस्वार चोरांनी सोने हिसकावले आणि ‘सुपरफास्ट एक्सप्रेस’सारखे अदृश्य झाले. हे पाहता, धाराशिवात ‘डिलिव्हरी बॉय’ आणि ‘गंठण चोर’ यांच्यात वेगाची स्पर्धा लागली आहे की काय, असा संशय नागरिकांना येऊ लागला आहे.
पोलिसांचे महत्त्वाचे काम सुरूच!
दरम्यान, पोलिसांनी ‘काहीच न करण्याचा’ आपला परंपरागत पवित्रा कायम ठेवला आहे. अवैध धंदेवाल्यांकडून हप्ते गोळा करणे, राजकीय पुढाऱ्यांचे स्वागत-समारंभ यासाठी गुन्हेगारांवर कारवाई करायला त्यांना वेळ नाही, असे दिसून येते.
सावधान! नागरिकांनी नवा ट्रेंड स्वीकारावा
गंठण चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांनी ‘मॅग्नेटिक लॉकेट’ किंवा ‘नोटांच्या माळा’ घालण्याचा विचार करावा, असे तज्ज्ञ सुचवत आहेत. तसेच, चोर पकडणे कठीण असल्याने लवकरच ‘स्वतःचे दागिने वाचविण्यासाठी प्रशिक्षण’ देण्याचा प्रस्ताव आहे!
धाराशिव पोलिसांना आता तरी जाग येईल का? की ‘गंठण चोरांना’ मानधन देऊन त्यांच्या ‘डेरिंग’ला सलाम ठोकला जाईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल!