धाराशिव: शहरात गुरुवारी रात्री कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला धाराशिव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कृष्णा नागनाथ शिंगाडे (वय ३०, रा. बौद्ध नगर, धाराशिव) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी रात्री सुमारे सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या स्मशानभूमीजवळून कृष्णा शिंगाडे हा तीन गोवंशीय गायींना घेऊन जात होता. या गायींची किंमत अंदाजे ६०,००० रुपये आहे. आरोपीने या जनावरांसाठी चारा-पाण्याची कोणतीही सोय केली नव्हती व त्यांना निर्दयतेने कत्तलीच्या उद्देशाने नेत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
धाराशिव शहर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गायींना ताब्यात घेतले आणि आरोपी कृष्णा शिंगाडे याच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमातील कलम ५(अ) आणि ९ नुसार गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.