धाराशिव: अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवकरांसाठी अखेर आनंदाची बातमी आली आहे. धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील ३१ एकरची मोक्याची जागा मंजूर झाली आहे. या जागेवर ३०० तज्ञ डॉक्टर उपलब्ध असलेले अत्याधुनिक आणि सर्वात मोठे वैद्यकीय संकुल उभारण्यात येणार आहे. या भव्य प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात ४३० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या अथक प्रयत्नांना यश आले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रवेश प्रक्रियेत आलेले अडथळे दूर करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने जागेचा प्रश्नही मार्गी लागला आहे.
२०१७ पासूनचा प्रवास
२०१७ मध्ये तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी धाराशिव येथे वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली होती. जिल्हा परिषदेने ४ एकर जागा मंजूर केली होती आणि ३० कोटी रुपये खर्चून इमारतही बांधण्यात आली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रवेश प्रक्रियेत अडथळे आले.
आता महायुती सरकारच्या काळात प्रवेश प्रक्रिया सुरळीत झाली आहे. या महाविद्यालयातून लवकरच पहिली बॅच डॉक्टर होऊन बाहेर पडेल. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गालगत असलेली ही जागा विद्यार्थी, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी अत्यंत सोयीची आहे.
३१ एकर जागेवर भव्य वैद्यकीय संकुल
या ३१ एकर जागेवर आधुनिक वैद्यकीय संकुल उभारण्यात येणार आहे. या संकुलात रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, निवासी इमारती, क्रीडांगण अशा अनेक सुविधा असतील.
काही जणांनी वैयक्तिक स्वार्थासाठी पोहनेर रस्त्यावरील दगडखानीजवळील अडगळीच्या जागेत वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आमदार पाटील यांनी तो हाणून पाडत धाराशिवकरांच्या हिताचा निर्णय घेतला आहे.
लवकरच धाराशिव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल आणि धाराशिवकरांचे आरोग्यसेवेचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला आहे.