धाराशिव – शासनाने ग्रामस्थांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला इंटरनेट जोडून विविध प्रकारचे दाखले व ग्रामपंचायत स्तरावरील नमुने ऑनलाईन केले आहेत मात्र याचे काम करणाऱ्या संगणक परिचालकाला कमी मानधनावर काम करावे लागत असल्याने संगणक परिचालकाने विविध मागण्यासाठी १७ नोव्हेंबरपासुन बेमुदत संपात सहभागी झाल्याने धाराशिव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत ऑफलाईन झाल्या आहेत.
ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून सुरु असलेल्या पुर्वीच्या संग्राम व सध्याच्या आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात मागील १२ वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर ग्रामविकास विभागाने नेमून दिलेले काम हे संगणक परिचालक करीत आहेत. वर्षानुवर्षे शासन यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असून यांना मजुरा पेक्षाही कमी मानधन मिळते. ग्रामपंचायतचे ऑनलाईन ऑफलाईन काम व इतर अनेक प्रकारची कामे प्रामाणिकपणे करुन सुद्धा महागाईच्या काळात केवळ सहा हजार नऊशे रुपये मानधनावर कुटुंब कसे चालवायचे असा प्रश्न या कर्मचाऱ्यांनी उपस्थित करून विविध मागण्यासाठी बेमुदत संप सुरू केला आहे.
या आहेत संगणक परिचालकाच्या मागण्या
ग्रामविकास विभागास जिल्हा परिषदेकडून प्राप्त झालेल्या अभिप्राया नुसार ग्रामपंचायतच्या सुधारीत फाईल वित्त विभागास त्वरित पाठवून संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्यात यावे. कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळेपर्यंत वीस हजार रुपये मासिक वेतन देण्यात यावे. नव्याने सुरु करण्यात आलेली चुकीची उद्दिष्टय पद्धत रद्द करण्यात यावी. पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या जुन्या संगणक परिचालकांना नियुक्ती देण्यात यावी. नियुक्ती झालेल्यांना न मिळालेले मानधन त्वरित देण्यात यावे.
बारा दिवसापासुन कामे ठप्प
संगणक परिचालक विविध न्याय मागणीसाठी बेमुदत संपावर असल्यामुळे नागरिकांना जन्म – मृत्यु प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, नमुना नंबर 8 आदी दाखले मिळत नसल्याने नागरिकांची अडचण निर्माण झाली आहे. या प्रमाणपत्र अभावी नागरिकांचे शासकीय व निमशासकीय कामे ठप्प झाली आहे.
” संगणक परिचालकावर अनेक कामाचे ओझे लादले जात आहेत. मात्र त्या कामाच्या तुलनेत मानधन मिळत नाही. बऱ्याच ठिकाणी एक ते ३३ नमुने उपलब्ध नाहीत. शासनाने मानधनात वाढ करुन दिलासा द्यावा. तसेच मुख्य मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत संप सुरू रहाणार आहे.- प्रशांत मुळे , जिल्हाध्यक्ष, संगणक परिचालक संघटना धाराशिव