वाशी – वाशी तालुक्यातील ईसरुप येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून तब्बल नऊ जणांनी एकत्र येऊन एका ४० वर्षीय महिलेला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, ही घटना १४ जुलै रोजी घडली असताना, पीडित महिलेने तब्बल २० दिवसांनी म्हणजेच ३ ऑगस्ट रोजी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
याप्रकरणी वाशी पोलिसांनी तीन वेगवेगळ्या गावांतील ९ जणांवर गुन्हा दाखल केला असून, यात एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रभावती बप्पासाहेब जाधवर (वय ४०, रा. ईसरुप) यांचा आरोपींसोबत पूर्वीपासून वाद होता. याच वादाचा वचपा काढण्यासाठी, दिनांक १४ जुलै २०२५ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी संगनमत करून गैरकायदेशीर जमाव जमवला. आरोपींनी प्रभावती यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर, कुऱ्हाडीच्या दांड्याने (तुब्याने) मारहाण करून त्यांना जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकीही दिली.
या घटनेनंतर घाबरलेल्या प्रभावती जाधवर यांनी ३ ऑगस्ट रोजी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी:
- ईसरुप (ता. वाशी) येथील: दत्ता भास्कर जाधवर, सुरेखा दत्ता जाधवर, कृष्णा दत्ता जाधवर, शिवकन्या दत्ता जाधवर
- भोगजी (ता. कळंब) येथील: बबन चिंतामनी मुंडे, अशोक चिंतामनी मुंडे, अन्नपुर्णा चिंतामणी मुंडे
- उत्तमी कायापुर (ता. धाराशिव) येथील: नवनाथ काशीनाथ बोंदर
या एकूण नऊ जणांवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार (118(1), 115(2), 351(2), 352, 189(2), 190, 191) गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये गैरकायदेशीर मंडळी जमवणे, दंगल माजवणे, धोकादायक शस्त्राने दुखापत करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.
एका महिलेवर हल्ला करण्यासाठी तीन वेगवेगळ्या गावांतील लोक एकत्र आल्याने आणि घटना घडल्यानंतर २० दिवसांनी गुन्हा दाखल झाल्याने परिसरात अनेक चर्चांना उधाण आले आहे. वाशी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.