धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, एकाच दिवशी विविध ठिकाणी मोठ्या घरफोड्या आणि चोऱ्यांच्या घटना घडल्या आहेत. तुळजापूर येथे मोबाईल शॉपी फोडून १३ लाखांचे मोबाईल, तर लोहारा येथे सराफ दुकान फोडून सुमारे ८ लाखांचे चांदी आणि रोकड चोरट्यांनी लंपास केली. यासह नळदुर्ग, ढोकी आणि येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतही चोऱ्या झाल्या असून, एकाच दिवशी सुमारे २९ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. या घटनांमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
तुळजापुरात भिंत फोडून १३ लाखांचे मोबाईल लंपास
तुळजापूर शहरातील खडकाळ गल्ली येथील एस.एस. मोबाईल शॉपीमध्ये १५ जुलै रोजी मध्यरात्री मोठी चोरी झाली. चोरट्यांनी शेजारी असलेल्या लस्सी सेंटरचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला आणि त्यानंतर मोबाईल शॉपीची भिंत फोडून आत प्रवेश केला. दुकानातून सॅमसंग, ॲपल आयफोनसह विविध कंपन्यांचे एकूण २० मोबाईल फोन चोरट्यांनी चोरून नेले. या चोरीत १३ लाख ३३ हजार ५९१ रुपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद सचिन नानासाहेब शिंदे यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.
लोहाऱ्यात सराफ दुकान फोडले
लोहारा शहरातील हिप्परगा रोडवर असलेल्या श्री जयलक्ष्मी माउली ज्वेलर्स या सराफ दुकानाचे चॅनल गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातून ८ किलो चांदी आणि ४०,००० रुपयांची रोकड असा एकूण ७ लाख ८१ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही घटना १५ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अविनाश बळीराम फुलसुंदर यांनी लोहारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
जिल्ह्यातील इतर ठिकाणीही चोऱ्या
- नळदुर्ग: चिवरी येथील महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या इंदुमती सोनवणे (रा. सोलापूर) यांच्या गळ्यातील ३ लाख रुपये किमतीचे चार तोळ्याचे सोन्याचे गंठण गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने चोरून नेले.
- येरमाळा: येरमाळा येथील एका साईटवरील ट्रान्सफॉर्मरमधून अज्ञात चोरट्याने सुमारे ४ लाख रुपये किमतीची तांब्याची तार चोरून नेल्याची तक्रार ज्ञानोबा मंदाडे यांनी दिली आहे.
- ढोकी: जवळे दुमाला येथील दोन वेगवेगळ्या गोठ्यांमधून एकूण ७४,००० रुपये किमतीच्या दोन पंढरपुरी म्हशी चोरीला गेल्या आहेत. तसेच, ढोकी शिवारातील एका शेतातून ४३,२०० रुपये किमतीचे बोअरवेलचे पाईप आणि इतर शेती साहित्य चोरीला गेले आहे.
या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.