धाराशिव: शहरात दागिने बनवून देण्याच्या बहाण्याने एका सराफाने अनेक ग्राहकांची तब्बल १७ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक करून दुकान बंद करून पळ काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी श्रीनिवास अशोक शहाने (रा. गजानन मार्केट, काळा मारुती चौक, धाराशिव ) याच्या विरोधात धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, आण्णा श्रीपती पौळ (वय ४१, रा. सारोळा, ता. जि. धाराशिव) यांनी आपल्या मुलासाठी सोन्याचे लॉकेट बनवण्यासाठी ‘मातोश्री अलंकार‘ या दुकानाचे मालक श्रीनिवास शहाने यांच्याशी संपर्क साधला. ही घटना ४ जुलै २०२५ रोजी घडली. पौळ यांनी १० तोळ्याच्या लॉकेटसाठी शहाणे याला १० लाख ४० हजार रुपये रोख दिले होते. शहाणे याने ९ जुलै २०२५ रोजी लॉकेट देण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, ९ जुलै रोजी पौळ दुकानावर गेले असता दुकान बंद असल्याचे त्यांना आढळून आले. आजूबाजूला चौकशी केली असता, शहाणे दुकान बंद करून पळून गेल्याचे त्यांना समजले.
याचवेळी, बालिका लिंबराज शिंदे रा. काजळा ( ता. धाराशिव ) यांनी देखील सदर सोनाराकडे ७ ग्रामचे झुबे टॉप्स ( किंमत ७२ हजार ८०० ) व पाच तोळ्याचे गंठण ( किंमत ५ लाख २० हजर ) असे एकूण ५ लाख ९२ हजार रुपयाचे दागिने करण्यासाठी टाकले होते. पैकी ५ लाख रुपये रक्कम दिली होती.. तसेच, लता सतीश आगळे नावाच्या महिलेचीही अडीच लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले.
अशाप्रकारे, आरोपी श्रीनिवास शहाणे याने आण्णा पौळ आणि इतर साथीदारांची एकूण १७ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. त्याने सोन्याचे दागिने देण्याचे वचन देऊन पैसे व सोने घेतले आणि नंतर दुकान बंद करून पलायन केले.
या घटनेप्रकरणी १२ जुलै २०२५ रोजी रात्री १० वाजून २३ मिनिटांनी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३१८(४) आणि ३१६(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र विक्रम अंभोरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
सदर सोनार लोकांचे दागिने गहाण ठेवून व्याजाने पैसे देत असे. त्याचा हा धंदा अनेक दिवसांपासून सुरू असल्याने लोकांचा त्याच्यावर विश्वास बसला होता. त्यातूनच जवळपास ३० हून अधिक लोकांनी त्याच्याकडे सोन्याचे दागिने गहाण ठेवून व्याजाने पैसे घेतले होते. अखेर, लाखो रुपयांचे दागिने घेऊन सदर सोनाराने पोबारा केला.