धाराशिव – सा. बां. उपविभाग क्र.१, धाराशिव येथील कनिष्ठ अभियंता रोहन मल्लिनाथ कांबळे यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई येथील अतिरिक्त मुख्य सचिवांना राजीनामा सादर केला आहे. कांबळे यांनी आपल्या राजीनाम्यात कामाच्या अतिरिक्त ताणाचा उल्लेख केला असून, त्यांच्यावर मूलभूत मानवी मूल्ये आणि भारतीय कामगार कायद्याचे उल्लंघन करणारी कामे जबरदस्तीने करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे.
कांबळे यांच्याकडे पोलीस विभागाचा कार्यभार असल्याने त्यांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटींची व्यवस्था आणि शासकीय विश्रामगृह धाराशिव व शासकीय विश्रामधाम शिंगोली यांचा देखील कार्यभार पहावा लागत होता. याशिवाय, त्यांना विविध कामांचा पाठपुरावा करण्यासाठी विभागीय कार्यालय, मंडळ कार्यालय, सा. बां. प्रादेशिक विभाग कार्यालय आणि मंत्रालय पर्यंत जावे लागत असे. निवडणूक कार्यक्रमांसाठी त्यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षांसाठी लिपीक म्हणून प्रतिनियुक्ती केली जात असे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आमदार / खासदार यांच्या बैठकींना देखील त्यांना हजर राहावे लागत असे.
या सर्व कामांमुळे त्यांना त्यांच्या नेहमीच्या कामाव्यतिरिक्त इतर कामांमध्येच कार्यालयीन वेळ घालवावा लागत असे आणि त्यांच्या वैयक्तिक वेळेतही कामे करावी लागत होती. यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होत असल्याचे आणि त्यांना मानसिक त्रास होत असल्याचे कांबळे यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे.
कांबळे यांनी आपल्या राजीनाम्यात उपविभागीय अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांनी त्यांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले आहे, परंतु कामाची व्याप्ती पाहता हे सर्व प्रकार वाढतच चालले आहेत. या परिस्थितीत बदल करण्यासाठी आणि इतर कनिष्ठ अभियंत्यांना चांगले काम करण्याचे बळ मिळावे यासाठी त्यांनी आपला राजीनामा स्वीकारावा अशी विनंती त्यांनी केली आहे.