धाराशिव – धाराशिव शहरातील कचरा डेपोमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असून, डेपोतून निघणाऱ्या दुर्गंधीयुक्त धुरामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येवर तातडीने तोडगा काढून कचरा डेपो इतरत्र हलवावा, अन्यथा २८ एप्रिल २०२५ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा युवा सेनेने दिला आहे. या मागणीचे निवेदन गुरुवारी युवा सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
युवा सेनेचे शहरप्रमुख रवी वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातून गोळा केला जाणारा कचरा शहरालगतच्या डेपोमध्ये टाकला जातो. गेल्या काही महिन्यांपासून या कचरा डेपोतून सातत्याने धूर निघत असून तो परिसरातील लोकवस्तीत पसरत आहे. उमर मोहल्ला, ख्वाजानगर, गणेशनगर, दर्गाह रोड, तालीम गल्ली, बस डेपो परिसर, आयुर्वेद महाविद्यालय परिसर, अहिल्यादेवी होळकर चौक, आगड गल्ली या भागांतील नागरिकांना या धुराचा आणि दुर्गंधीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
या विषारी धुरामुळे अनेकांना डोळ्यांची जळजळ आणि श्वसनाचे त्रास सुरू झाले आहेत, ज्यामुळे डोळ्यांचे व श्वसनाचे गंभीर विकार जडण्याची भीती निर्माण झाली आहे. नगरपरिषदेच्या गलथान कारभारामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप युवा सेनेने केला आहे.
या कचरा डेपोतील कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करून त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करावी. जर हे शक्य नसेल, तर नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून हा कचरा डेपो तातडीने शहराबाहेर इतरत्र हलविण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या समस्येबाबत यापूर्वीही नागरिकांनी निवेदने दिली होती, मात्र प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
जर प्रशासनाने या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना केली नाही, तर २८ एप्रिल २०२५ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले जाईल, असा स्पष्ट इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर युवा सेनेचे शहरप्रमुख रवी वाघमारे यांच्यासह प्रवीण कोकाटे, प्रदीप मुंडे, सोमनाथ गुरव, बाळासाहेब काकडे, पांडू भोसले, गणेश खोचरे आणि इतर अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.