एकीकडे विकासाच्या बाबतीत महाराष्ट्रात सर्वात तळाला आणि देशातील मागास जिल्ह्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असल्याची नामुष्की, तर दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या उदासीनतेमुळे आणि वादांमुळे खुंटलेली विकासाची गंगा; अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या धाराशिव जिल्ह्याला आता एका नव्याच सामाजिक कीडीने पोखरण्यास सुरुवात केली आहे. बेरोजगारी आणि व्यसनाधीनतेच्या गर्तेत अडकलेल्या तरुणाईला बरबाद करणारी ‘कला केंद्र’ नावाची ही कीड जिल्ह्याच्या सामाजिक स्वास्थ्याला सुरुंग लावत आहे. कलेच्या नावाखाली चालणारा हा बिभत्सपणा आणि त्यातून फोफावणारी गुन्हेगारी जिल्ह्याला एका मोठ्या विनाशाच्या उंबरठ्यावर घेऊन आली आहे.
कलेचा मुखवटा, आत गुन्हेगारीचा अड्डा


‘कला केंद्र’ हा शब्द ऐकल्यावर डोळ्यासमोर पारंपरिक तमाशा, लावणी आणि लोककलेचे फड उभे राहतात. ढोलकीचा कडकडाट, घुंगरांचा मंजुळ नाद आणि अस्सल मराठमोळ्या कलेचा आविष्कार अपेक्षित असतो. मात्र, धाराशिव जिल्ह्यात ‘कला केंद्र’ या गोंडस नावाखाली एक विकृत ‘फॅड’ सुरू झाले होते. बंद खोलीत, पारंपरिक वाद्यांऐवजी कानठळ्या बसवणाऱ्या डीजेच्या तालावर चालणारा धांगडधिंगा, अर्धनग्न अवस्थेतील युवतींचा बिभत्स नाच आणि त्यांच्यावर तरुणांनी उधळलेले पैशांचे बंडल, हे या ‘कले’चे विदारक स्वरूप होते. साडेतीन हजार रुपये प्रति तास या दराने तरुणांच्या टोळक्यांना आकर्षित करून त्यांना व्यसनाधीन आणि कंगाल बनवण्याचा हा एक संघटित सापळा होता. जिल्ह्यातील सहा कला केंद्रे या अवैध खेळाचे अड्डे बनले होते आणि आणखी सहा मंजुरीच्या प्रतीक्षेत होती, हे जिल्ह्याचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
आत्महत्या आणि हत्येने फुटली वाचा


या अंधाऱ्या जगातील भयाण वास्तव तेव्हा उघड झाले, जेव्हा बीड जिल्ह्यातील लुखामसला गावाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी सप्टेंबर २०२५ मध्ये आत्महत्या केली. वाशी येथील ‘तुळजाई कला केंद्रा’तील पूजा गायकवाड नावाच्या नर्तिकेच्या नादी लागून त्यांनी आपली सर्व संपत्ती गमावली आणि प्रेमात धोका मिळाल्याने तिच्याच घरासमोर स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. यानंतर, चोराखळी येथील ‘कालिका कला केंद्रा’तील नर्तिकांवर उमरग्याच्या अभिषेक शिंदे या तरुणाची हत्या केल्याचा गंभीर आरोप झाला आणि ‘महाकालिका कला केंद्रा’वर तर दोन गटात झालेल्या हाणामारीत थेट गोळीबार झाला. या घटनांनी स्पष्ट केले की, ही कला केंद्र नसून गुन्हेगारी आणि मृत्यूचे सापळे आहेत.
प्रशासनाचा बडगा, पण अर्धवट कारवाई का?


एकापाठोपाठ एक घडलेल्या या गंभीर घटनांनंतर अखेर प्रशासन जागे झाले. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी लक्ष घातल्यानंतर पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या पथकाने धडक कारवाई करत या केंद्रांमधील गैरप्रकार चव्हाट्यावर आणले. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी कठोर भूमिका घेत पोलिसांच्या अहवालावर तातडीने कार्यवाही केली. आधी ‘तुळजाई’, मग ‘पिंजरा’, त्यानंतर विनापरवाना चालणारे ‘साई’ आणि आता अटी-शर्तींचा भंग व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले ‘गौरी’ आणि ‘कालिका’ ही कला केंद्रे कायमस्वरूपी बंद करण्यात आली. प्रशासनाच्या या धडक कारवाईचे निश्चितच कौतुक करायला हवे. पाच केंद्रांना टाळे ठोकून प्रशासनाने जिल्ह्याला लागलेले ग्रहण सोडवण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे.
मात्र, या कौतुकासोबतच एक गंभीर प्रश्नचिन्हही उभे राहते. ज्या चोराखळी गावात ‘कालिका’ केंद्रावर कारवाई होते, त्याच गावातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ‘महाकालिका कला केंद्रा’ला अभय का दिले जात आहे? ज्या ठिकाणी दिवसाढवळ्या गोळीबार होतो, ते केंद्र अजूनही कसे सुरू राहू शकते? सहापैकी पाच केंद्रे बंद होत असताना, एका केंद्राला वाचवण्यासाठी कोणता ‘कलाकार’ पडद्याआड सूत्रे हलवत आहे, याचा शोध घेणे आवश्यक आहे. जोपर्यंत शेवटचा अड्डा उद्ध्वस्त होत नाही, तोपर्यंत ही लढाई जिंकली असे म्हणता येणार नाही.
भविष्यातील धोका ओळखा
धाराशिवला ‘कला केंद्रांचा हब’ बनवण्याचा काही राजकीय शक्तींचा छुपा अजेंडा या निमित्ताने उघड झाला आहे. आळणी येथे एका बड्या राजकीय नेत्याने महाराष्ट्रातील सर्वात मोठे कला केंद्र बांधून मंजुरीसाठी ठेवले आहे, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. प्रशासनाने सध्या सुरू असलेली कारवाई अधिक तीव्र करत, उरलेले ‘महाकालिका’ केंद्र तात्काळ बंद करावे आणि भविष्यात कोणत्याही नवीन कला केंद्राला परवानगी नाकारावी. विकासापासून वंचित असलेल्या या जिल्ह्याला उद्योगांची, शिक्षणाची आणि रोजगाराची गरज आहे; घुंगरांच्या तालावर तरुणाईला बरबाद करणाऱ्या या विकृत ‘कले’ची नाही. जिल्हा प्रशासनाने कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता ही कीड मुळापासून उखडून टाकावी, हीच धाराशिवच्या सुज्ञ जनतेची अपेक्षा आहे. नाहीतर, विकासाच्या प्रतिक्षेत असलेल्या या जिल्ह्याचे भविष्य घुंगरांच्या तालावर कायमचे अंधारात गडप होईल.
- सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह







