धाराशिव: कळंब तालुक्यातील वडगाव (ज) येथील ‘गौरी सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र’ आणि चोराखळी येथील ‘कालिका सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र’ या दोन प्रसिद्ध कला केंद्रांचे परवाने जिल्हादंडाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी कायमस्वरूपी रद्द केले आहेत. परवान्यातील अटी व शर्तींचे उल्लंघन आणि गंभीर गुन्हे दाखल झाल्याच्या पोलीस अधीक्षक, धाराशिव यांच्या अहवालानंतर ही धडक कारवाई करण्यात आली.
‘गौरी’ कला केंद्रावर नियमबाह्य कामांचा ठपका


वडगाव (ज) येथील सुदर्शन श्रीकृष्ण शेळके यांच्या मालकीच्या ‘गौरी सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्रा’वर स्थानिक गुन्हे शाखेने १९ सप्टेंबर २०२५ रोजी केलेल्या तपासणीत गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या. तपासणी दरम्यान, नर्तिकांसाठीच्या खोल्यांमध्ये आवश्यक रंगमंच (स्टेज) आढळून आला नाही आणि उपस्थित प्रेक्षकांकडे कोणतेही प्रवेश पास किंवा तिकीट सापडले नाही. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या केंद्रावर यापूर्वीही दोन गंभीर गुन्हे दाखल असल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे, मुंबईच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने १२ एप्रिल २०२२ रोजी या केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला होता. या सर्व बाबींचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्राला दिलेले ना-हरकत प्रमाणपत्र आणि इतर तीन परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याचा आदेश दिला.
‘कालिका’ कला केंद्र चालकांवर खुनाचा गंभीर गुन्हा
चोराखळी येथील श्रीमती निर्मला मोहनराव जाधव यांच्या ‘कालिका सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्रावर’ देखील १९ सप्टेंबर २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेने तपासणी केली. येथेही ‘गौरी’ कला केंद्राप्रमाणेच रंगमंच आणि प्रेक्षकांकडे तिकीट/पास आढळून आले नाहीत. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय, या कला केंद्रातील सरोजा चिकुंद्रे, रेणू पवार व अनिता जाधव या महिलांवर उमरगा येथील अभिषेक कालिदास शिंदे या तरुणाची हत्या केल्याचा गंभीर आरोप आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल असून प्रकरण तपासावर आहे. पोलीस अधीक्षकांच्या अहवालात या गंभीर गुन्ह्याचा उल्लेख करून परवाना रद्द करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी या केंद्राचा परवानाही कायमस्वरूपी रद्द केला आहे.
एक प्रश्नचिन्ह
यापूर्वी वाशी तालुक्यातील ‘तुळजाई’ आणि धाराशिव तालुक्यातील ‘पिंजरा’ व ‘साई ‘ ही कला केंद्र बंद करण्यात आली होती. आता ‘गौरी’ आणि ‘कालिका’ यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मात्र, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या चोराखळी येथील ‘महाकाली’ कला केंद्राला अभय देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.






