धाराशिव – कळंब विधानसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक अत्यंत महत्वाची ठरणार आहे, कारण या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन गटांमधील थेट लढत होणार आहे. एकीकडे महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार कैलास पाटील (शिवसेना – उबाठा गट) आहेत, तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे (शिवसेना – शिंदे गट) आहेत. यामुळे मतदारसंघात सध्या तणावपूर्ण आणि रोमांचक वातावरण निर्माण झाले आहे.
आ. कैलास पाटील: एक सुसंस्कृत आणि निर्विवाद व्यक्तिमत्व
कैलास पाटील हे धाराशिव – कळंब मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या ५ वर्षांच्या कालावधीत, ते अडीच वर्षे सत्ताधारी होते, तर अडीच वर्षे विरोधी बाकावर होते. कोविड-१९ महामारीच्या काळात सत्तेतील प्रमुख अडीच वर्षे त्यांनी निभावली, ज्यामुळे त्यांच्या कारकीर्दीतील अनेक योजनांचा प्रभाव फारसा दिसला नाही. तथापि, त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून घेण्यात मोठे यश मिळवले, जे त्यांच्या कार्यकाळातील महत्वाचे काम मानले जाते.
त्यांच्या कामांमध्ये आमदार निधीतून काही ठिकाणी विकासकामे करण्यात आली असली, तरी मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल संमिश्र भावना आहेत. पाटील हे त्यांच्या शांत आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वामुळे ओळखले जातात. त्यांनी कधीही वादग्रस्त किंवा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण केली नाही. यामुळेच विरोधकांनी त्यांच्यावर कधीच आक्रमक टीका केली नाही. आता यावेळी, मतदार त्यांना पुन्हा संधी देतील का, हा मोठा प्रश्न आहे.
अजित पिंगळे: कट्टर शिवसैनिक ते महायुतीचा उमेदवार
अजित पिंगळे हे कळंब तालुक्यातील एक अत्यंत सक्रिय आणि कट्टर शिवसैनिक आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांविरोधात म्हणजे कैलास पाटील विरुद्ध बंडखोरी केली होती आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांच्या शिट्टी या चिन्हावर त्यांनी जवळपास २०,००० मते मिळवली होती, जरी त्यांचा पराभव झाला तरी. पराभवानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि कळंब तालुक्यात भाजपचे अध्यक्ष म्हणून काम केले.
धाराशिव मतदारसंघातील शिवसेनेच्या शिंदे गटाला जागा मिळाल्यानंतर, अजित पिंगळे पुन्हा शिवसेनेत परतले. उमेदवारीच्या शर्यतीत असताना, त्यांनी भाजपमधून आलेल्या सुधीर पाटील आणि शिवसेना उध्दव ठाकरे गटामधून आलेल्या शिवाजी कापसे यांच्यापेक्षा बाजी मारली. महायुतीने त्यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली आहे.
पिंगळे यांचे कळंब तालुक्यात प्राबल्य आहे, परंतु धाराशिव शहर आणि तालुक्यातील ४३ गावांमध्ये त्यांना अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. सत्ताधारी पक्षाचे उमेदवार असल्याने, त्यांना भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा आशीर्वाद आहे. “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना” ही योजना पिंगळे यांच्या शिवसेना पक्षाला गेमचेंजर ठरू शकते का, हे सध्या चर्चेत आहे.
लढत तीव्र, मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने?
आ. कैलास पाटील आणि अजित पिंगळे दोघेही शिवसेनेच्या वेगवेगळ्या गटांचे प्रतिनिधित्व करत आहेत. या दोघांमधील लढत अत्यंत तगडी होणार आहे. एकीकडे विद्यमान आमदार म्हणून कैलास पाटील यांना जनतेचा विश्वास आहे, तर दुसरीकडे, अजित पिंगळे यांची कट्टर शिवसैनिक म्हणून असलेली ओळख त्यांना कळंब तालुक्यातील मतं मिळवून देईल, अशी अपेक्षा आहे.
या निवडणुकीचे निकाल २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानानंतर स्पष्ट होतील. २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार असून, त्यानंतरच कोणाच्या गळ्यात विजयाचा गुलाल पडेल, हे निश्चित होईल. सध्या तरी या निवडणुकीच्या लढतीत कोण बाजी मारणार याचा अंदाज बांधणे अवघड आहे. तथापि, ही निवडणूक मतदारसंघात मोठ्या रस्सीखेची ठरणार असून, निकाल कोणताही असला तरी तीव्र राजकीय संघर्षाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे.