धाराशिव : कळंब आणि धाराशिव ग्रामीण भागात सध्या भुरट्या चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. एकाच दिवशी (४ मार्च) वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत चोरीचे तब्बल चार गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये घरासमोर उभ्या असलेल्या दोन दुचाकी, मोटार रिवाइंडिंग दुकानातील साहित्य आणि जलशुद्धीकरण केंद्रातील साहित्याचा समावेश आहे. विशेष म्हणजे जलशुद्धीकरण केंद्रात चोरी करणाऱ्या चार महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जलशुद्धीकरण केंद्रातून साहित्य चोरणाऱ्या बीडच्या ४ महिलांवर गुन्हा
कळंब तालुक्यातील डिकसळ येथील जलशुद्धीकरण केंद्रातून ८० एमएमचा काळ्या रंगाचा व्हॉल्व्ह, टेलपीस, २५० एमएमसीआय जॉईंट असे एकूण १३ हजार रुपयांचे साहित्य चोरीला गेले. ही घटना ४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
याप्रकरणी भैरवनाथ भगवान राखुंडे (५४, रा. मार्केट यार्ड, कळंब) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बीड जिल्ह्यातील सोनाली दिलीप अंकुशे, ताई विष्णू अंकुशे (दोघी रा. बार्शी नाका, बीड), जिजाबाई लक्ष्मण रोकडे आणि तारामती नायबा अंकुशे (दोघी रा. केज, जि. बीड) या चार महिलांवर कळंब पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शेडचे पत्रे उचकटून मोटारी आणि केबलची चोरी
कळंब शहरातील मोहेकर चौक (देवीरोग) येथे माणिक गोरोबा शिंदे (४४, रा. इंदिरानगर) यांचे मोटार रिवाइंडिंगचे शेड आहे. ३ ते ४ मार्च दरम्यान अज्ञात चोरांनी या बंद शेडचा मागील पत्रा उचकटून आत प्रवेश केला. चोरांनी लाडा लक्ष्मी कंपनीच्या दोन मोटारी (३ एचपी व १.५ एचपी) आणि १०० फूट केबल असा एकूण २४,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी कळंब पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरासमोरून दोन दुचाकी लंपास
चोरट्यांनी धाराशिव आणि कळंब परिसरातून घरासमोर लावलेल्या दोन दुचाकी पळवल्या आहेत:
-
पहिली घटना: धाराशिव ग्रामीण हद्दीतील गडदेवदरी येथील ओम विजय कांबळे (१९) यांची ७० हजार रुपये किमतीची मोटरसायकल (MH 25 BG 2417) २८ फेब्रुवारी ते १ मार्चच्या दरम्यान घरासमोरून अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
दुसरी घटना: कळंब तालुक्यातील मोहा येथील खैसर आमीन शेख (२६) यांची ६० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची टीव्हीएस रेडऑन दुचाकी (MH 25 BH 3231) ३ मार्च रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास घरासमोरून चोरीला गेली. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या सर्व प्रकरणांचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत. वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.







