धाराशिव – धाराशिवचा वसुली एजंट ‘खोक्या’ आशिष विसाळ सध्या मुंबई मंत्रालय परिसरात मुक्त संचार करत असल्याचे समजताच, मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या शोधासाठी दोन दिवस (सोमवार, मंगळवार) मंत्रालय परिसरात मोहीम राबवली. मात्र, त्याला याची कुणकुण लागताच तो कुठेतरी लपून बसला आणि कार्यकर्त्यांच्या हाती लागला नाही.
व्हॉट्सअॅप डीपीवर महसूल आयुक्तांचा फोटो, दिशाभूल करण्याचा प्रयत्न
याशिवाय, या खोक्याने नाशिकचे महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचा फोटो व्हॉट्सअॅप डीपीवर ठेवत लोकांची दिशाभूल करण्याचा प्रकार सुरू केला आहे. हा फोटो पाहून अनेकांना वाटते की, तो डॉ. गेडाम यांचा जवळचा आहे
डॉ. गेडाम हे आपले एकदम क्लोज मित्र असून ते आपल्या शब्दाच्या बाहेर जात नाहीत, असे सांगून खोक्या लोकांना फसवत आहे, अशी माहिती आहे.
आयुक्तांची तंबी, तरीही ‘खोक्या’ ऐकण्यास तयार नाही
या संदर्भात स्वतः डॉ. प्रवीण गेडाम यांनी त्याला तंबी दिली होती आणि डीपी काढण्यास सांगितले होते. मात्र, आशिष विसाळने अद्याप ती डीपी बदललेली नाही. त्यामुळे त्याच्यावर तातडीने पोलिस कारवाई करण्यात यावी आणि गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
अवैध वसुलीचा काळा इतिहास
आशिष विसाळ हा दोन वर्षांपूर्वी धाराशिव, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार असताना आ. सुरेश धस यांच्या संपर्कात आला. त्याने स्वतःला त्यांच्या खासगी पीए म्हणून दाखवून अधिकारी, नगरपालिका कर्मचारी आणि व्यावसायिकांना धमकावून वसुली सुरू केली.
त्याच्या कारनाम्यांमध्ये –
✔ अवैध बांधकामांना धमकावून पैसे उकळणे
✔ नगरपालिका भ्रष्टाचाराच्या नावाखाली लोकांना ब्लॅकमेल करणे
✔ सरकारी अधिकाऱ्यांना ‘तुमचा हरीकल्याण येळगट्टे करू’ अशी धमकी देऊन खंडणी वसूल करणे
हे प्रकार समोर आले आहेत.
सरपंच हत्या प्रकरणाच्या नावाखाली खंडणीचा प्रयत्न
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याच्या नावाखाली सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून खंडणी मागण्याचा प्रकारही विसाळने केला. मात्र, मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्याला रंगेहाथ पकडून जबर मारहाण केली.
याच्या मागे मोठे ‘सामर्थ्यवान’ हात?
आशिष विसाळचा मंत्रालय परिसरातील मुक्त वावर कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, हा मोठा प्रश्न आहे. ज्या आमदाराने संबंध नाही असे जाहीरपणे सांगितले, त्याच्यासाठी हा व्यक्ती कसा आणि का काम करत आहे?
पोलिसांनी कारवाई करावी, अन्यथा मोठे आंदोलन
मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी याप्रकरणी पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे. आशिष विसाळचा मुंबईतील मंत्रालय परिसरातील संचार आणि महसूल आयुक्तांचा फोटो गैरवापर करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रकार गंभीर असल्याने लवकरच कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.