धाराशिव – धाराशिव नगरपरिषद हद्दीतील मिळकत क्र. ४१२७ मध्ये आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने गुरुवर्य के. टी. पाटील यांचा विनापरवाना उभारलेला पुतळा हटवण्याच्या कारवाईला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. आनंदनगर पोलिसांनी आता पुन्हा हात झटकले असून, पोलीस बंदोबस्त देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षकांना असल्याचे कळवले आहे. यावरून पोलीस यंत्रणा मॅनेज झाल्याची चर्चा सुरु आहे.
नगरपरिषदेने ६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता हा पुतळा हटवण्याचे नियोजन केले होते. मात्र, ५ आणि ६ ऑगस्ट रोजी धाराशिव शहरात महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींचे दौरे होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सोलापूर येथील मराठा आरक्षणासंबंधीच्या वक्तव्यावरून मराठा आरक्षण आंदोलकांनी धाराशिवमध्ये आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन, पुतळा हटवण्याच्या कारवाईसाठी पुरेसे पोलीस बंदोबस्त उपलब्ध होऊ शकणार नाही, असे पोलिसांनी नगरपरिषदेला कळवले होते.त्यामुळे या दिवशी गुरुवर्य के. के. टी. पाटील यांचा अनधिकृत पुतळा वाचला होता.
त्यानंतर नगरपरिषदने आनंदनगर पोलिसांना पत्र लिहून पोलीस बंदोबस्त केव्हा मिळेल, अशी विचारणा केली होती. त्यावर आनंदनगर पोलिसांनी पुन्हा हात झटकले आहेत.पोलीस निरीक्षक एस. आर. थोरात यांनी नगरपरिषदेला कळवल्यानुसार, धाराशिव जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त पुरवण्याचे अधिकार पोलीस अधीक्षकांकडे आहेत. त्यामुळे, पुतळा हटवण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त मिळवण्यासाठी नगरपरिषदेने पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधावा, असे पोलिसांनी सुचवले आहे.
के. टी. पाटील यांचा अनधिकृत पुतळा काढण्यासाठी पोलीस विभाग पोलीस बंदोबस्त देत नाही. एकमेकांवर टोलवाटोलवी करीत असल्याने पोलीस यंत्रणा मॅनेज झाल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी आपण छत्रपती संभाजीनगर खंडपीठात जनहित याचिका दाखल करणार असून, त्यात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, नगर पालिका आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ यास प्रतिवादी करणार असल्याचे तक्रारदार बाळासाहेब सुभेदार यांनी सांगितले.