धाराशिव – आदर्श शिक्षण मंडळाने भोसले हायस्कूलच्या प्रांगणात उभारलेला के. टी. पाटील यांचा पुतळा अनधिकृत ठरवून तो निष्कासित करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी नगर परिषदेला दिला होता. या आदेशाविरुद्ध सुधीर पाटील यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे धाव घेतली होती.
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित श्रीपतराव भोसले हायस्कूल, धाराशिव यांनी धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांच्या ११ जुलै २०२४ रोजीच्या आदेशाविरुद्ध केलेल्या पुनर्विलोकन याचिकेवर राज्य शासनाने निर्णय दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती दिली आहे.
सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव दि. ब. मोरे यांनी ८ ऑगस्ट रोजी यासंदर्भात पत्र जारी केले आहे. या पत्रात जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणी आवश्यक कार्यवाहीसाठी नगरपरिषद धाराशिवच्या मुख्याधिकाऱ्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे श्रीपतराव भोसले हायस्कूलला तात्पुरता दिलासा मिळाला असून, पुढील शासन निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
न्यायालयात धाव घेणार
आदर्श शिक्षण मंडळाने शासनाने दिलेल्या क्रीडांगणावर बेकायदेशीर इमारत बांधली आहे, इतकेच नव्हे तर शासनाची परवानगी न घेता अनधिकृत पुतळा उभारला आहे. म्हणूनच जिल्हाधिकाऱ्यांनी पुतळा अनधिकृत ठरवून तो निष्कासित करण्याचा आदेश नगर परिषदेला दिला होता, परंतु पोलिसांनी पोलीस बंदोबस्त न दिल्याने हा पुतळा वाचला होता.
दुसरीकडे सुधीर पाटील यांनी हे गैरकृत्य थोपवण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुधीर पाटील यांच्या कारनाम्याची कदाचित माहिती नसावी. परंतु मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाविरुद्ध आम्ही छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याचे तक्रारदार बाळासाहेब सुभेदार यांनी सांगितले.