धाराशिव – येथे 23 जुलै रोजी रात्री एका वृद्ध दाम्पत्यावर झालेल्या लूटमारीच्या घटनेचा धाराशिव पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून लुटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
65 वर्षीय चाँद शाहाबुद्दीन शेख हे त्यांच्या पत्नीसह धाराशिवहून आंबेहोळला जात असताना हॉटेल बालाघाटजवळ मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी त्यांना अडवले. त्यांनी वृद्ध महिलेच्या हातावर चाकूने वार केले आणि वृद्ध पुरुषाला मारहाण करून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि 15,000 रुपये रोख लुटून नेले.
या घटनेनंतर धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखा आणि धाराशिव शहर पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि चिकाटीच्या प्रयत्नांनंतर 8 ऑगस्ट रोजी पोलिसांनी दोन आरोपींना कुरणे नगर येथून ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी दिनेश नागनाथ काळे (20 वर्षे) आणि काका शंकर शिंदे (21 वर्षे) यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून लुटीचे 15,000 रुपये, सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी धाराशिव पोलीस ठाण्याकडे सोपवले आहे.
धाराशिवमध्ये म्हशीची चोरी, आरोपी ताब्यात
धाराशिव जिल्ह्यातील चिखली गावात एका शेतकऱ्याची ९०,००० रुपये किमतीची म्हैस चोरीला गेल्याची घटना घडली. हनुमंत मच्छिद्र काळे यांच्या शेतातून ७ ऑगस्टच्या रात्री ही म्हैस चोरीला गेली होती. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्परतेने कारवाई करत अवघ्या काही तासांतच आरोपी शिवराम यशवंत काळे याला वरुडाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून चोरीची म्हैसही हस्तगत करण्यात आली आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी बेंबळी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.