धाराशिव – धाराशिव शहरातील यशदा मल्टीस्टेट समोरून तीन महिन्यांपूर्वी एका पादचाऱ्याच्या खिशातून मोबाईल हिसकावणाऱ्या एका विधीसंघर्ष बालकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून १०,००० रुपये किमतीचा चोरीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून, गुन्ह्यातील साथीदाराचे नावही निष्पन्न झाले आहे.
पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील मालमत्ता विषयक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आणि फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी गस्त घालत होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांचा या पथकात समावेश होता.
गस्तीदरम्यान, पथकाला तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आनंदनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील (गुरनं ०६/२०२५, कलम ३०४ (२) भा.न्या.सं.) चोरीस गेलेला मोबाईल फोन साठेनगर, धाराशिव येथे राहणाऱ्या एका विधीसंघर्ष बालकाकडे आहे. या खात्रीशीर माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ साठेनगर परिसरात जाऊन शोध घेतला असता, संबंधित विधीसंघर्ष बालक आयुर्वेदिक कॉलेज समोर आढळून आला.
पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील मोबाईलबाबत विचारपूस केली असता, त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, अंदाजे तीन महिन्यांपूर्वी त्याने आणि त्याचा साथीदार विशाल बापू जाधव (रा. साठेनगर, धाराशिव) यांनी मिळून विशालच्या फॅशन प्रो मोटारसायकलवरून जात असताना यशदा मल्टीस्टेट समोरील रस्त्यावरून चाललेल्या एका व्यक्तीच्या शर्टच्या खिशातून हा मोबाईल हिसकावून घेतला होता.
या कबुलीनंतर पथकाने विधीसंघर्ष बालकाच्या ताब्यातून १०,००० रुपये किमतीचा चोरीचा मोबाईल जप्त केला. पुढील कायदेशीर कारवाईसाठी गुन्ह्यातील मुद्देमालासह विधीसंघर्ष बालकास आनंदनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, पोहेकॉ विनोद जानराव, समाधान वाघमारे, नितीन जाधवर, बबन जाधवर, चालक पोअं विनायक दहीहंडे, पोअं प्रकाश बोईनवाड (TAW), आणि सुनिल मोरे यांच्या पथकाने केली आहे.