धाराशिव: स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) जिल्ह्यात मोठी कारवाई करत मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल २ लाख ४० हजार रुपये किमतीच्या एकूण ६ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे कळंब, तुळजापूर, परांडा आणि शिरोढोण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या आदेशानुसार, जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रयत्न सुरू आहेत. गुरुवारी (दि. ३ एप्रिल २०२५) स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार आणि त्यांचे पथक कळंब परिसरात गस्तीवर असताना, त्यांना एका गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कळंब हद्दीत एक इसम चोरीच्या मोटारसायकली विकण्याचा प्रयत्न करत आहे.
या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ सापळा रचून संशयित इसमाचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता, त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्याने सांगितले की, तो आणि त्याचा एक साथीदार मिळून मोटारसायकली चोरतात आणि त्या कळंब एमआयडीसी परिसरातील एका निर्जन ठिकाणी लपवून ठेवतात.
पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, तिथे एकूण ६ मोटारसायकली आढळून आल्या. या गाड्यांची एकूण किंमत २ लाख ४० हजार रुपये आहे. पोलिसांनी गुन्हे अभिलेखाची तपासणी केली असता, या मोटारसायकली कळंब, तुळजापूर, परांडा आणि शिरोढोण पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले.
ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव फारुख तांबोळी (वय ४२ वर्षे, रा. कळंब, जि. धाराशिव) असे आहे. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी फारुख तांबोळी आणि जप्त केलेल्या ६ मोटारसायकलींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी तुळजापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. पोलीस त्याच्या फरार साथीदाराचा शोध घेत आहेत.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हेडकॉन्स्टेबल शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल डोंगरे यांच्या पथकाने केली आहे.