धाराशिव: मोटारसायकल चोरी आणि वाहनांमधून माल लंपास करणाऱ्या दोघा आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. सिद्राम पोपट पवार आणि रमेश राजाभाऊ पवार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून २,०५,४८३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यात पाच मोटारसायकली, केबल वायर आणि खापरी पेंडीच्या पोत्यांचा समावेश आहे.
पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके आणि अमोल मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथक गुन्हेगारी रोखण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, वरूडा पारधी पिढी येथील सिद्राम पवार आणि रमेश पवार यांनी चोरलेल्या मोटारसायकली, केबल वायर आणि खापरी पेंडीचे पोते आपल्या घराजवळील शेडमध्ये लपवून ठेवले होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाड टाकली. पोलिसांना पाहताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने त्यांना शिताफीने पकडले.
त्यांच्या घराजवळील शेडची झडती घेतली असता, तेथे चोरलेल्या पाच मोटारसायकली, केबल वायर आणि खापरी पेंडीचे पोते आढळून आले. चौकशीदरम्यान आरोपींनी धाराशिव, भूम, सोलापूर, बीड आणि केज येथून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. तसेच, धाराशिवमधील एका दुकानातून आणि वरूडा रोडवरून जाणाऱ्या ट्रकमधून एका साथीदाराच्या मदतीने केबल वायर आणि खापरी पेंडीची पोती चोरल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालाची माहिती घेतली असता, मोटारसायकल चोरीप्रकरणी आनंदनगर, भूम, केज, सोलापूर येथील फौजदार चावडी आणि बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. तसेच केबल वायर आणि खापरी पेंडी चोरी प्रकरणी आनंदनगर आणि धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
पंचनामा करून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपींना पुढील कारवाईसाठी आनंदनगर पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन खटके, सपोनि अमोल मोरे आणि त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार विनोद जानराव, अमोल निंबाळकर, नितीन जाधवर, महिला पोलीस हवालदार शोभा बांगर, पोलीस नाईक बबन जाधवर, चालक पोलीस हवालदार महेबुब अरब, विनायक दहिहंडे, आणि प्रकाश बोईनवाड यांनी केली आहे.