धाराशिव: गेल्या आठ वर्षांपासून पोलिसांना आणि न्यायालयाला गुंगारा देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. बबन आबा शिंदे असे या आरोपीचे नाव असून, तो गंभीर गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड होता. वेष बदलून वेगवेगळ्या ठिकाणी राहत असलेल्या या आरोपीला कळंब तालुक्यातील डिकसळ येथून अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बबन आबा शिंदे (रा. पिंपळगाव (क), ता. वाशी, जि. धाराशिव, ह.मु. कल्पनानगर, कळंब) याच्यावर येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३९/२०१४ अन्वये भारतीय दंड विधान कलम ३९६, ३९७, ३६४, ४१२, २०१ सह मोक्का कायद्याच्या कलम ३(१), ३(२), ३(४), ३(५) नुसार आणि धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ५८/२०१४ अन्वये कलम ३९५ नुसार गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये न्यायालयाकडून अटक वॉरंट (NBW) जारी झाल्यानंतर शिंदे हा फरार झाला होता.
गेल्या आठ वर्षांपासून तो सतत आपले ठिकाण आणि वेष बदलून पोलिसांना चकवा देत होता. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीच्या वडिलांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून आपला मुलगा मयत झाल्याचे कळवले होते. त्यामुळे पोलिसांच्या विविध पथकांनी शोध घेऊनही तो सापडत नव्हता. अखेर, धाराशिव सत्र न्यायालयाने पोलीस अधीक्षकांना या आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक नेमण्याचे आदेश दिले.
त्यानुसार, पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या आदेशाने दिनांक १ एप्रिल २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक स्थापन करण्यात आले. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, पोलीस हवालदार विनोद जानराव, समाधान वाघमारे, पोलीस नाईक नितीन जाधवर, बबन जाधवर, चापोहे महेबुब अरब आणि पोलीस अंमलदार प्रकाश बोईनवाड यांचा समावेश होता.
पथकाने कळंब परिसरात आरोपीचा शोध सुरू केला असता, गुप्त बातमीदारामार्फत आरोपी डिकसळ येथे असल्याची माहिती मिळाली. पथकाने तात्काळ डिकसळ गाठून सापळा रचला आणि बबन शिंदे याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.या कारवाईमुळे एका सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात यश आले आहे.